शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली असल्यामुळे नागरिकांनी एपीएमसी मार्केट यार्ड येथे गर्दी करू नये, असे आवाहन शनिवारी जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठ अर्थात बेळगाव एपीएमसी मार्केट उत्तर कर्नाटकातील एक मोठे भाजी मार्केट आहे. याठिकाणी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्यामुळे शेतकरी व्यापारी आणि नागरिकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. तथापि कोरोना हा अतिशय संसर्गजन्य रोग असल्यामुळे मार्केटमध्ये नागरिकांनी तसेच खरेदी विक्री करणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांनी गर्दी करू नये. भाजीपाला विक्री त्यांनी सोशल डिस्टन्स अर्थात सामाजिक अंतर ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे. तथापि अद्यापही एपीएमसी येथे सामाजिक अंतर न ठेवता भाजीपाला विक्री केली जात असल्यामुळे मोठी गर्दी होत आहे. या पद्धतीने सूचनेचे उल्लंघन करून नागरिक एकमेकांच्या जीवाशी खेळत असल्याने प्रशासनाने शनिवारी सक्त पावले उचलली आहेत.
दररोज घरोघरी भाजीपाला पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्यामुळे यासाठी प्रथम शहरातील नागरिकांनी एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये भाजी विक्री करणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवून आपला व्यवसाय करावा, अशी सक्त सूचनाही करण्यात आली आहे. सदर सूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
दरम्यान बेळगाव एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांना शिस्त लागावी यासाठी शनिवारी सायंकाळी मार्केट आवारात सामाजिक अंतरासाठी मार्किंग करण्यात आले. यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या मार्किंगच्या ठिकाणी शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांनी आपला व्यवसाय करावयाचा आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनी मार्किंगप्रमाणे उभे राहून भाजीपाला खरेदीचा व्यवहार करायचा आहे.