काळाची गरज लक्षात घेऊन गरीब व गरजू ज्येष्ठ नागरिकांना सावली देऊन मदत करण्याच्या उद्देशाने रुपा चोळाप्पाचे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका गटाने अलीकडेच मंडळी रोडवरील भवानीनगर येथे “आनंद यात्री” या वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे.
प्रगती महीला अभिवृद्धी संघ (पीएमएएस) ज्याच्या रूपा चोळप्पाचे अध्यक्ष आहेत, या संघातर्फे सदर वृद्धाश्रम चालविला जात आहे. यासंदर्भात बोलताना रूपा चोळाप्पाचे म्हणाल्या की, मी गेली अनेक वर्षे समाजकार्य करत आहे. या कालावधीत मला अशी बरीच वृद्ध मंडळी भेटली की ज्यांना या ना त्या कारणाने बेघर होऊन असहाय जीवन जगावे लागत होते. या वृद्ध मंडळींना आपुलकी, प्रेम, निगा, निवारा आणि कौटुंबिक वातावरणाची गरज असते. असहाय्य बेघर वृद्ध मंडळींना हे सर्व मिळावे या उद्देशाने पीएमएएसने 12 जण राहू शकतील इतका मोठा बंगला अलीकडेच भाड्याने घेऊन वृद्धाश्रम सुरू केला आहे, असे रूपा यांनी सांगितले.
भविष्यात सर्व सुविधांनी युक्त आणि प्रशस्त आवार असलेल्या स्वतःच्या जागेत हे वृद्धाश्रम स्थलांतरित करण्याचा आमचा विचार आहे. सध्या पीएमएएसकडून आनंद यात्रीमध्ये आधुनिक स्वयंपाकघर, प्रशस्त डायनिंग हॉल, गरम पाण्याची सोय असलेले अटॅच टॉयलेट्स, स्टोअर रूम, करमणुकीची खोली, वाचनालय आदी आधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. आनंद यात्रीचा कार्यभार सांभाळण्यात रूपा यांना त्यांचे पती शेखर चोळाप्पाचे, राजू सुतार व संतोष पुजारी यांची मदत मिळत आहे. या वृद्धाश्रमात प्राधान्याने गरीब असहाय्य वृद्धांना आणि गरजूंना प्रवेश दिला जातो.
आनंद यात्रीमध्ये दाखल करुन घेतलेल्या प्रत्येक सदस्याला कॉट, चादर, उशी, मच्छरदानी, उशीचे अभ्रे आणि वैयक्तिक साहित्य ठेवण्यासाठी छोटे कपाट दिले जाते. त्याचप्रमाणे त्यांना न्यूट्रिशन एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली पॉस्टिक अन्न आणि शुद्ध पिण्याचे पाणी पुरविले जाते. वृद्धाश्रमातील सदस्यांची दर आठवड्याला मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांना कन्नड मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रे व मासिके पुरविण्याबरोबरच टेलिव्हिजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे रूपा चोळाप्पाचे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या रूपा चोळाप्पाचे या ग्रुपवर बेळगाव सहलीच्या सलग तीन वर्षे अध्यक्ष होत्या. त्याचप्रमाणे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील सेंट्रल अडोप्शन रिसोर्स अथोरिटी सल्लागार समितीच्या त्या सदस्य आहेत.