मार्कंडेय नदीचे पावित्र्य सध्या धोक्यात आले असून नदीमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. यामुळे परिसरातील शेती धोक्यात आली असून यासाठी सांडपाणी प्रकल्प उभारणीचे काम केव्हा हाती घेणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तातडीने हे प्रकल्प उभे करून नदीतील होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
मार्कंडे नदीत मिसळणारे दूषित पाणी रोखण्यासाठी कंग्राळी येथे हे सांडपाणी प्रकल्प उभे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी येथे सांडपाणी प्रकल्प उभे करू असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र त्या आश्वासनाकडे त्यांनी कानाडोळा केला आहे. त्याचबरोबर काकती येथे सांडपाणी प्रकल्प उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही त्याला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे.
सध्यातरी काकती येथे सांडपाणी प्रकल्प उभे करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अजून चार ते पाच ठिकाणी सांडपाणी प्रकल्प उभे करून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. मात्र अजूनही एकाही सांडपाणी प्रकल्पाला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे सध्यातरी नदी दूषित होत असून ड्रेनेज मिश्रित पाण्यामुळे अनेक शेती अडचणीत आले आहेत.
कंग्राळी येथे ड्रेनेज पाणी पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी प्रलंबित सांडपाणी प्रकल्प उभे केले असता त्याची शेतकऱ्यांना चिंता वाटली नसती. मात्र सांडपाणी प्रकल्प पूर्वीच पाणी सोडण्यात प्रशासन धन्यता मानत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.