जिल्ह्यातील स्थगित असलेल्या पाटबंधारे योजना दोन महिन्यात सुरू करण्यात येतील. जिल्ह्यातील तळी आणि अन्य कालव्याचे कार्यही त्वरित सुरू करण्यात येईल.
कोणत्याही कारणास्तव पाण्याच्या योजना रखडणार नाहीत.बल्लारी नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.यासाठी बल्लारी नाल्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याची सूचना जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कर्नाटक जल निगमच्या बैठकीत अधिकाऱ्यांना केली.
बल्लारी नाल्याच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.काम चांगल्या पद्धतीने करा अशी सूचनाही जारकीहोळी यांनी केली.जलाशयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जलाशयातील पाणी सोडले जाणार आहे.जलाशयातील पाणी सोडल्यामुळे जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही जारकीहोळी यांनी केले.
बैठकीला जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या मांडल्या.या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिले.बैठकीला जिल्ह्यातील आमदार आणि कर्नाटक जल निगमचे अधिकारी उपस्थित होते.