समाजात आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी लोकमान्य सोसायटीने सक्रीय झाले पाहिजे. तसेच बँकिंगची ताकद वाढवायची असेल तर सातत्याने बचत करणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केले.
यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित ‘उन्नती – 2020 एक पाऊल प्रगतीकडे’ हा महिलांसाठीचा भव्य तिळगुळ समारंभ आज शनिवारी मराठा मंदिरच्या सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. या समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी कांचन परुळेकर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ग्राहकांशी आदराची वागणूक ठेवा, त्यांच्याशी सुसंवाद ठेवा, त्यांना क्वालिटी टाईम द्या, संस्थेच्या प्रगतीमध्ये तुमचाही वाटा आहे असे ग्राहकांना जाणवू द्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांचा विश्वास कमवा. ग्राहकांनीही लक्षात ठेवले पाहिजे की सर्वांचे सोंग घेता येते पैशाचे नाही. बँकिंगची ताकद वाढवायची असेल तर सातत्याने बचत ही गरजेची आहे. चुकीच्या जागी पैसा गुंतवणे हे व्यसन आहे. तसेच कमाईपेक्षा खर्च जास्त होऊन चालणार नाही. नोकरीच्या वाटा अरुंद होत असताना बचत करणे महत्त्वाचे असून बचत, गुंतवणूक, कर्ज आणि कर्जाची परतफेड या चार सूत्रावर सहकार व ग्राहक यांचे नाते दृढ होईल, असा आशावाद कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला.
व्यासपीठावर सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि लोकमान्य सोसायटीच्या संचालिका गायत्री काकतकर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी मनीषा नुगानहट्टी यांनी लोकमान्य सोसायटीबद्दल माहिती दिली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार यांनी करून दिला, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले.
यावेळी आयोजकांतर्फे गायत्री काकतकर यांच्या हस्ते हस्ते कांचन परुळेकर व अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांचा शाल व लामणदिवा देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाखा व्यवस्थापक ज्योती रेगे यांनी गायत्री काकतकर यांचा सत्कार केला.
सदर दिमाखदार कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्याद्वारे झाली. यावेळी बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी लेझीम प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर स्त्री शक्तीचा आविष्कार प्रकट करणारे कालिका देवीचे नृत्य माधुरी बोंद्रे या नृत्यांगणेने सादर केले.
‘उन्नती – 2020 एक पाऊल प्रगतीकडे’ या तिळगुळ समारंभाच्या उद्घाटनानंतर उन्नती गृहलक्ष्मींसाठीच्या विविध स्पर्धा आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा आणि खेळांचे संचालन शालिनी चौगुले कीर्ती टेंबे व कीर्ती धोरणावर यांनी केले. उद्घाटन समारंभासह स्पर्धा व खेळ यशस्वी करण्यासाठी लोकमान्यच्या शाखा व्यवस्थापक ज्योती रेगे, मार्केटिंग मॅनेजर मालिनी बाली, मनीषा नुगानहट्टी आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उन्नती – 2020 एक पाऊल प्रगतीकडे या तिळगुळ समारंभास महिलांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे मराठा मंदिरचे सभागृह तुडुंब भरले होते.