पोलीस वाहनाकडूनच रहदारी नियमांचा भंग झाल्याची घटना गुरुवारी तिसऱ्या रेल्वे गेटनजिक घडली. तथापि पोलीस म्हणजे उद्धट, दुजाभाव करणारे वगैरे वगैरे आरोप सातत्याने केले जातात. मात्र हे आरोप किती चुकीचे आहेत हे पोलिस खात्याने दाखवून देताना आपल्याच खात्याच्या जीपवर रहदारी नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद केला.
याबाबतची अधिक माहिती अशी की तिसऱ्या रेल्वे गेटनजिक काल गुरुवारी पोलिसांची एक जीपगाडी (केए 22 जी 1110) रस्त्यावर रॉंग साईडने दामटण्याचा येत होती. हा प्रकार या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त करत पोलिसांवर जोरदार टीका केली. त्याचप्रमाणे काही मंडळींनी रस्त्यावरून रॉंग साईडने जाणाऱ्या संबंधित पोलीस जीपचे मोबाईलवर चित्रीकरण केले. हे चित्रीकरण लागलीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. सदर प्रकाराबद्दल अनेकांनी आपला आक्षेप व नाराजी व्यक्त करत कॉमेंट्स केले, तसेच बऱ्याच जणांनी ट्विटरवर ट्विट देखील केले. पोलिसांना सर्व गुन्हे माफ आहेत का? असा सवालही उपस्थित केला गेला.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस खाते खडबडून जागे झाले. पोलीस आयुक्तांनी तर या प्रकाराची गंभीर दखल घेऊन लागलीच संबंधित पोलीस
जीपवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश देत कायदा हा सर्वांसाठी समान असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, तिसऱ्या रेल्वे गेटनजीक रॉंग साईडने पोलिस जीप चालविण्यात आल्याच्या घटनेची चर्चा दिवसभर होताना दिसत होती.
सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांचे काम सुरू आहे त्यामुळे बर्याच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. या मार्गावर रहदारी पोलिसांची विशेष नजर असते तातडीच्या कामामुळे अथवा घाईत असलेले वाहन चालक बऱ्याचदा या एकेरी मार्गाचा वापर करतात परिणामी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला जातो अथवा दंड आकारला जातो. सध्या शहरातील रस्त्यांचे दुरवस्था पाहता घाईगडबड अथवा तातडीच्या कामामुळे अनावधानाने वाहनचालकांकडून चुका होतात हे पोलीस खात्याने समजून घेतले पाहिजे, अशी प्रतिक्रिया गुरुवारी पोलीस वाहनाच्या बाबतीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त होताना दिसत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी (विशेष करून टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथे) अनावश्यक बॅरिकेड्स टाकून रस्ते बंद करण्यात आले आहेत, ते खुले करण्यात यावेत. जेणेकरून वाहतुकीची कोंडी न होता ती सुरळीत होईल, अशी मागणीही केली जात आहे.