कर्नाटकातील कन्नडीगांसाठी नोकरीत आरक्षणाची शिफारस करणाऱ्या डॉ. सरोजिनी महिषी अहवालाची अंमलबजावणी केली जावी, या मागणीसाठी उद्या गुरुवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ‘कर्नाटक बंद’ची हाक देण्यात आली आहे.
राज्यातील कन्नड अभिमानी संघटनांच्या विलीनीकरणाद्वारे स्थापण्यात आलेल्या कर्नाटक संघटनांच्या वक्कूटतर्फे ही कर्नाटक बंदची हाक देण्यात आली असून त्याबरोबरच 100 दिवसांचे निषेध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील खाजगी आणि सरकारी या दोन्ही क्षेत्रात कन्नडीगांना नोकरीत आरक्षणाची शिफारस करणाऱ्या डॉ. सरोजिनी महिषी अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी कर्नाटक संघटनांचे वक्कुटने केली आहे. डॉ. सरोजिनी महिषी अहवाल 1986साली तयार केला गेला असून त्यामध्ये कन्नडीगांना सरकारी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात नोकरीमध्ये आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आजपर्यंतच्या सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने या अहवालातील बहुतांश शिफारसींची अंमलबजावणी केली आहे. तथापि बहुतांश कन्नडाभिमानी संघटनांचा राज्यात कन्नडीगांना नोकरीमध्ये जास्तीत जास्त आरक्षण मिळावे, असा आग्रह आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक कन्नड अभिमानी संघटना, मंडळे, ट्रान्सपोर्ट संघटना आणि कामगार संघटनांनी कर्नाटक बंदला आपला संपूर्ण पाठिंबा दर्शविला असल्याचे कर्नाटक संघटनांचे वक्कूटचे सदस्य नागेश यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्यातील सुमारे 100 हॉटेल संघटनांसह दुकानदार आणि खाजगी वाहतूक सेवा देणाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला असून उद्या गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कर्नाटक बंद पाळला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र या बंद दरम्यान शाळा कॉलेजना सुट्टी नसल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं आहे