बेळगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीतून या रेल्वेस्थानकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र येथील समस्या जैसे थे असल्याने नागरिकांतून आणि प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावर विज जाण्याचे प्रकार घडल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे स्मार्ट रेल्वेस्थानक होत असले तरी समस्या जुन्याच आहेत असे दिसून येत आहे.
सोमवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत वीज गायब झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. सोमवारी रात्री रेल्वे स्थानकावर असलेल्या लिस्टमध्ये एकजण अडकला होता. वीज गायब झाल्याने लिफ्ट मध्येच बंद पडली होती. त्यांना सोडवण्यासाठी तब्बल अर्धा तास प्रयत्न करण्यात आला. त्या नंतर त्यांची सुटका झाली. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे स्थानकावर दररोज वीज गायब होण्याच्या घटना घडत आहेत. बेळगाव बेंगलोर रेल्वे आले असताना हा प्रकार घडला आहे. वीज गायब झाल्याने या प्रवाशांना रेल्वे पकडता आली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. रेल्वे स्थानकावरील लिफ्ट वारंवार बंद अवस्थेतच असते. सध्या लिफ्ट सुरू असली तरी वीज गायब होत असल्याने अनेक प्रवासी त्यामध्ये अडकून पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे.दररोज रात्री नऊ वाजता बेळगाव बंगळुरू इंटरसिटी रेल्वे साठी जाणाऱ्या प्रवाश्यांना याचा फटका बसत आहे.
स्मार्ट सिटीतून रेल्वे स्थानकाचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र ते संथ गतीने सुरू असल्याने कामाचा खेळखंडोबा होत आहे. रेल्वे स्थानकावर अघोषित वीज कपात करण्यात येत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानण्यात येत आहे. यापुढे तरी असे प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ते उपाय योजना आखावी अशी मागणी होत आहे.