स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सुरू झालेली रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण होणार असून आता या योजनेअंतर्गत बहुमजली वाहनतळ, सोलार प्रकल्प, सार्वजनिक सायकल वापर प्रकल्प आदी नवे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटी योजनेचे चेअरमन राकेश सिंग यांनी बेळगावातील नव्या स्मार्ट प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. परिणामी कांही दिवसात हे नवे प्रकल्प पीपीपी (खाजगी भागीदारीतून) उभारणीला प्रारंभ होणार आहे. सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध कामांना चालना मिळाली आहे. येत्या चार महिन्यात रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत. शहरात बापट गल्ली पार्किंग, लक्ष्मी मार्केट पार्किंग, जिल्हा रुग्णालयासमोरील पार्किंग याठिकाणी पार्किंगची सोय असली तरी शहरातील पार्किंगची समस्या अद्यापही सुटलेले नाही. यासाठीच स्मार्ट सिटी योजनेद्वारे ही समस्या सोडविण्यात येणार असून यासाठी बहुमजली वाहनतळ उभारले जाणार आहे.
सार्वजनिक सायकल वापर प्रकल्प म्हैसूर येथे यशस्वी ठरला असल्यामुळे हा प्रकल्प बेळगावातही राबविण्यात येणार आहे. सायकल पुरवठा करण्यासाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच शहरातील विविध भागात लोकांना सायकली भाड्याने देण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहेत. यामुळे वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघेल असा स्मार्ट सिटी योजनेचा आशावाद आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेसह सर्व सरकारी कार्यालयांसाठी 30 मेगावॉट वीज निर्मितीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी व्यापक प्रमाणात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सध्या अनेक सरकारी कार्यालयांवर सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत.