शहरात बेजबाबदार पद्धतीने रखडत सुरू असलेली स्मार्ट सिटीची विकास कामे नागरिकांसाठी मनस्तापाची ठरत असून कांही ठिकाणी ही कामे मृत्यूचा सापळा ठरत असल्याने याच्या निषेधार्थ गुरुवार दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी आंदोलन छेडून भव्य मोर्चाद्वारे एल्गार केला जाणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांनी बेळगाव लाईव्हला ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मार्ट सिटी या विकास कामासंदर्भात दाखविला जाणारा बेजबाबदारपणा आणि दुर्लक्ष, त्याचप्रमाणे अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या कामांमुळे शहरवासीयांना सहन करावा लागणारा मनस्ताप याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, यासाठी स्वतः सुरेंद्र अनगोळकर हे आपल्या सहकार्यांसह उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करणार आहेत. तत्पूर्वी धर्मवीर संभाजी चौक येथून 13 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात येणार आहे. विकास करा मात्र जनतेच्या जीवाशी खेळून नको यातून मार्ग काढा असे ते म्हणाले.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट सिटी लिमिटेड बेळगावकडून सध्या शहरात सर्वत्र विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. एकाच वेळी अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्यामुळे बहुतांश रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. यामुळे लहान-मोठे अपघात घडत असून वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणामुळे बहुतांश ठिकाणी एकेरी वाहतूक केली जात आहे. या एकेरी वाहतुकीमुळे तसेच अर्धवट अवस्थेतील दुभाजकांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. एकेरी वाहतुकीमुळे आज एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागले. खानापूर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर आज बुधवारी सकाळी टँकरने ठोकल्याने
जाधवनगर येथील करणसिंग रजपूत हा दुचाकीस्वार ठार झाला.
अर्धवट अवस्थेतील रस्ते तसेच उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसानही होत आहे उखडलेल्या आणि उंच-सखल रस्त्यांमुळे दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनचे एक्सेल, बंपर आदींचे नुकसान होत असल्याने वाहनचालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकंदर स्मार्ट सिटीची विकास कामे नागरिकांच्या सोयीची होण्याऐवजी गैरसोयीची होत आहेत. हा प्रकार थांबून संबंधित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी उद्या गुरुवारी मोर्चासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील युवक मंडळ विविध संघटना तसेच नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गुरुवारी 13 रोजी सकाळी 10 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी केले आहे.