मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीच्या कामांना चालना देण्यात आली अनेक रस्ते खणून ठेवण्यात आले आहेत. हे रस्ते अनेकांचे जीव धोक्यात घालणारे ठरू लागले आहेत. मात्र याकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे दिसून येते आहे. वारंवार होणारे अपघात आणि त्यातून अनेकांचे जीव धोक्यात जाऊ लागले आहेत. आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या कामांमुळे दोघांचा बळी गेला असला तरी याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावातील अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. मात्र हे रस्ते वेळेवर होत नसल्याने अपघात घडत आहेत. एकेरी वाहतूक केल्याने मोठी समस्या निर्माण होत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याचा परिणाम अपघातावर जाऊन पोहोचत आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून रस्त्यांची कामे तातडीने करण्याची गरज व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक रस्ते खोदाई करून ठेवण्यात आले आहेत. मात्र ते कधी पूर्ण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची अवस्था सध्यातरी दुर्दैवी ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याला वाली आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
बेळगाव शहरातील बऱ्याच रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असली तरी ती कमी पूर्ण होत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. एकेरी वाहतूक व इतर अपघात घडत आहेत. त्यामुळे एकेरी वाहतुकीचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. तब्बल महिना-दोन महिने झाले तरी रस्त्यांची कामे पूर्ण होत नसल्याने रहदारीच्या कोंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही पिडा कधी संपणार असाच सवाल नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.