स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हिंदवाडी येथील महावीर भवन ते सर्वोदय मार्गपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या नोव्हेंबर 2019 मध्ये सुरू झाले असले तरी या ठिकाणी रस्त्याशेजारी पाईपलाईनसाठी हाती घेण्यात आलेले खोदाईचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत पडून असल्याने नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया होत असून हे काम केव्हा पूर्ण होणार? असा सवाल केला जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हिंदवाडी येथील महावीर भवन ते सर्वोदय मार्गपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या नोव्हेंबर 2019 मध्ये सुरू झाले. त्यावेळी या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या गटारी शेजारी सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पाईपलाईन घालण्यासाठी 10 फूट खोल आणि 8 फूट रुंद चर खोदण्यात आली आहे. प्रारंभापासूनच संथगतीने सुरू असलेले हे काम आता गेले दोन महिने बंदावस्थेत आहे. त्यामुळे खोदलेल्या सरीतील मातीचे ढिगारे रस्त्यावर पडले आहेत. या मातीचा ढिगार्यांमुळे वाहतुकीस अडचण तर होतच आहे, शिवाय धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मातीच्या ढिगार्यांसह रस्त्यावर साचलेल्या मातीच्या जाड थराचा अंदाज न आल्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वारंवार अपघात देखील घडत आहेत. या व्यतिरिक्त खोदकामामुळे या मार्गावरील अनेक रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या आणि टेलिफोन बंद पडले आहेत. यामुळे संबंधितांची मोठी गैरसोय होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तेंव्हा स्मार्ट सिटी योजनेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन महावीर भवन ते सर्वोदय मार्ग पर्यंतच्या रस्त्याशेजारी घालण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी जोरदार मागणी केली जात आहे.