देशद्रोही घोषणा आणि वक्तव्य करून देशातील धार्मिक व जातीय सलोखा तसेच शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱी बेंगलोरची विद्यार्थिनी अमुल्या लियोन आणि महाराष्ट्रातील माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तानने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदर निवेदन आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन सोमवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमुल्या लियोन आणि वारिस पठाण यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
सीएए व एनआरसीच्या विरोधात गेल्या 20 फेब्रुवारी रोजी राज्यभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बेंगलोर येथे अशाच एका कार्यक्रमात अमूल्या लियोन या विद्यार्थिनीने प्रक्षोभक भाषण करताना पाकिस्तान जिंदाबाद! अशी घोषणा दिली. त्याचप्रमाणे अन्य एका घटनेत गुलबर्गा येथे महाराष्ट्रातील माजी आमदार वारीस पठाण याने देशातील बहुसंख्य हिंदू धर्मियांना प्रक्षोभक भाषणाद्वारे डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही 15 कोटी मुस्लिम सीएए आणि एनआरसीच्या विरोधात रस्त्यावर उतरलो तर 100 कोटी हिंदूंची काय अवस्था होईल याचा विचार करा? असे उद्गार पठाण यांनी काढले आहेत. हे दोघेही आपल्या हिंदू व देश विरोधी भाषणांव्दारे देशातील धार्मिक व जातीय सलोखा आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेंव्हा वारिस पठाण व अमुल्या लियोन यांच्यासह संबंधित कार्यक्रमांच्या आयोजकांवर आयपीसी 124/ए व 153 ए कलमान्वये गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करते वेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, श्रीकांत कुरियाळकर राहुल बडसकर, परशुराम पाखरे, भारत पाटील, संजय रायकर, बळवंत शिंदोळकर, अभ्युदय इंडकर, शंकर पाटील, सचिन चव्हाण, मुकेश राजपुरोहित, श्रेयस नाकाडी, सुनील कोटगाळी, सदानंद मासेकर, रोहन आगलावे, डॉ. अंजेश कणगलेकर आदी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.