बेळगाव सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या सर्व 67 शिवसैनिकांना “शहीद” दर्जा देण्यात यावा
अशी मागणी सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.त्यांचे सहकारी मंगेश चिवटे यांनी बेळगावात हुतात्मा दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
शिंदे यांनी दूरध्वनीवरून बेळगावमधील मराठी जनतेशी संवाद साधतबेळगाव सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार उभे असूनसर्वोच्च न्यायालयातील लढाई राज्य सरकार संपूर्ण ताकदीने लढणार असल्याची ग्वाही दिली.
शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे सीमा लढ्यातील शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज शनिवार सकाळी गांभीर्याने पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याचे नगरविकास मंत्री आणि सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी खास संदेश पाठवून सीमा लढ्यातील शिवसेनेसह सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
रामलिंग खिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे आज सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सम्राट अशोक चौकातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रकाश शिरोळकर यांच्यासह अन्य काहींची समयोचित भाषणे झाली. बंडू केरवाडकर, दत्ता जाधव, राजकुमार बोकडे, रवींद्र जाधव आदींसह बरेच शिवसैनिक सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री व सीमाभागाचे समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशात 1 नोव्हेंबर 1968 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बेळगावमध्ये जाहीर सभेत सीमाप्रश्नी केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता या तपशिलासह त्यानंतर बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी 8 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे शिवसेनेने छेडलेले आंदोलन, माननीय बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी आदी नेत्यांनी केलेले आंदोलनाचे नेतृत्व, त्यांना झालेली अटक, तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी अडवून शिवसैनिकांनी केलेले रास्ता रोको आंदोलन, 67 शिवसैनिकांनी पत्करलेले हौतात्म्य, सीमाप्रश्नी शिवसेनेने छेडलेल्या या आंदोलनामुळे सतत आठ दिवस जळत असलेली मुंबई आदी गोष्टींचा उल्लेख आहे.
सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात मला बेळगावच्या राणी चन्नम्मा चौक येथे अटक झाली. त्यावेळी मी स्वतः दीड महिने बेळ्ळारी जेलमध्ये कारावास भोगला आहे. त्यामुळे सीमा लढ्याशी माझी नाळ जोडली गेली आहे. तेंव्हा बेळगाव आणि समस्त सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत, महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी आणि सीमाभाग समन्वय मंत्री या नात्याने मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या बेळगाव सीमाभागातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो, अशा आशयाचा तपशीलही मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशात नमूद आहे.