आता मानवी हस्तक्षेपाविना सेन्सर पद्धतीने ड्रायव्हिंगची टेस्ट होऊन वाहनचालकांना संगणकाद्वारे तात्काळ ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी बेळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कणबर्गी तलावाशेजारी 8 कोटी 5 लाख रुपये खर्चाचा ड्रायव्हिंग लायसन्स ट्रॅक बनवण्यात येत असल्याची माहिती बेळगाव विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी दिली आहे.
सेन्सर पद्धतीने ड्रायव्हिंगची टेस्ट घेण्यासाठी कणबर्गी तलावाशेजारी 4 एकर जागेमध्ये ड्रायव्हिंग ट्रॅक उभारण्यात येत आहे. अत्याधुनिक पद्धतीने हा ट्रेक उभारण्यात येणार असून ड्रायव्हिंग टेस्टचे व्हिडिओ शूटिंग देखील केले जाणार आहे. याचा अहवाल थेट संगणकाला जोडण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांना तात्काळ संगणकाद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध केला जाणार आहेत. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही, असे अधिकारी शिवानंद मगदूम याने स्पष्ट केले.
आता ज्या ठिकाणाहून वाहन खरेदी केले जाते तेथूनच वाहनांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप जवळपास पूर्णपणे थांबला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात डिजिटल फलक बसविण्यात आले असून त्यावर कोणत्या नियमभंग साठी किती दंड तसेच कोणत्या अभ्यासासाठी किती कालावधी लागेल याची माहिती देण्यात आली आहे. फलकावर नमूद केल्याप्रमाणे काम न झाल्यास नागरिक आणि आपल्याकडे तक्रार करावी असे आवाहन मगदूम यांनी केले आहे.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी येत्या चार महिन्यात कणबर्गी तलावा शेजारील नवा ड्रायव्हिंग ट्रॅक उपलब्ध होणार असून लायसन्सची ही प्रक्रीया मानवरहित असणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्सचे वितरण करण्यात येणार असल्यामुळे एजंटगिरीला पूर्णपणे आळा बसणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी स्पष्ट केले आहे.