एकीकडे विजेची बचत करण्याचे आवाहन करणारे हेस्कॉम दुसरीकडे स्वतःच याबाबतीत किती बेजबाबदार आहे, हे शास्त्रीनगर व न्यू गूडशेड रोडवरील दिवसाढवळ्या जळणाऱ्या पथदीपांवरून दिसून येते
शास्त्रीनगर व न्यु गुडशेड रोड रस्त्यावरील पथदीप गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी बंद असतात. रात्री बंद अवस्थेत असलेले हे पथदीप दिवसा मात्र पेटलेले असतात. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांचा हा उरफाटा कारभार सध्या या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. शास्त्रीनगर व न्यु गुडशेड रोड रस्त्यावरील पथदीप दिवसा ढवळ्या जळत असल्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शिवाय रात्रीच्या वेळी या भागातील खराब रस्ते आणि भरीस भर म्हणून पथदिप बंद असल्यामुळे नागरिकांना विशेष करून दुचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महानगरपालीकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार व स्ट्रीट लाईटच्या कामाची जबाबदारी घेतलेल्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप केला जात आहे. तरी महापालिका आयुक्तांनी याकडे त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.