बेळगाव महापालिकेने परवाना दिला असला तरी गांधीनगर येथे उभारण्यात येत असलेले भाजी मार्केट हे बेकायदेशीर असून छोट्या किरकोळ भाजी विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत या भाजी मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करू नये अन्यथा भविष्यात त्यांना मोठा फटका बसू शकतो, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. आनंद केणी यांनी केले आहे.
गेली तीन वर्षे चर्चेत असलेल्या गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केटच्या बांधकामाला बेळगाव महानगरपालिकेने परवाना दिल्यामुळे भाजी व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तथापि भाजी मार्केटचे सदर बांधकाम बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात आज सोमवारी हॉटेल मिलनच्या सभागृहांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. आनंद केणी यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खुलासेवार माहिती दिली. तत्कालीन तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून त्रयस्थाच्या नावावर बेकायदेशीररित्या सदर भाजी मार्केट इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. काही जागरूक मंडळींनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या या बांधकामास उच्च न्यायालयातसह सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अद्यापही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
गांधीनगर येथील भाजी मार्केट इमारत उभारणीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी व तहसीलदारांना अंधारात ठेवून बेकायदा परवाना उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सदर बांधकामास शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडा आणि एपीएमसी यांची अधिकृत परवानगी नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील अद्याप याप्रकरणी आपला अंतिम निकाल राखून ठेवलेला आहे. अशा परिस्थितीत बेळगाव महापालिकेने सदर भाजी मार्केटच्या बांधकामास परवानगी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हा प्रकार चुकीचा असून संबंधित भाजी मार्केट बेकायदेशीर असल्यामुळे जर का लहान-सहान किरकोळ भाजी विक्रेत्यांनी या भाजी मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात त्यांना मोठा फटका बसू शकतो. कारण कोणत्याही क्षणी सर्वोच्च न्यायालय आपल्या आदेशाद्वारे गांधीनगर येथील भाजी मार्केट जमिनदोस्त करू शकते, अशी माहिती ॲड. आनंद केणी यांनी दिली.
राजकारणी मंडळी व अधिकारी गांधीनगर येथील भाजी मार्केटचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. तेंव्हा किरकोळ भाजी विक्रेत्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस अन्य वकील मंडळी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगाव जिल्हा प्रशासनाचे अधिकारी बेकायदेशीर रित्या या जय किसान मार्केटला सुरू करण्यासाठी खतपाणी घालत आहेत अश्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे पत्रकार राजू टोपन्नवर म्हणाले.
एकीकडे ए पी एम सी मार्केट मध्ये कुजलेला भाजी पाला योग्य रित्या विल्हेवाट केला जातो कम्पोस्टखत निर्माण केलं जातंपर्यावरण खात्याची देखील याला अनुमती आहे.शेतकऱ्यांना रयत भवन बांधण्यात आले आहे दक्षिण भारतातील सुसज्ज मोठं ए पी एम सी मार्केट तयार असताना न्यु गांधी नगर येथे सर्व्हिस रस्त्या शेजारी बेकायदेशीर रित्या हा घाट घातला जात आहे याला अधिकारी पाठीशी घालत आहेत असा आरोप देखील टोपन्नवर यांनी केला