महापालिकेकडून तब्बल 1 टन प्लास्टिक जप्त, 82 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई
बेळगाव महानगरपालिकेने आपली प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र केली असून आज सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहराच्या मध्यवर्ती भागात कारवाई करताना एकूण 12 दुकानांवर छापे टाकून तब्बल 1 टन प्लास्टिक तर जप्त केलेच शिवाय 82 हजार रुपये इतका दंडही वसूल केला आहे.
प्लास्टिक बंदीसंदर्भात बेळगाव महापालिकेने गेल्या डिसेंबर महिन्यानंतर आज सोमवारी पहिल्यांदा मोठी कारवाई केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी आज शहरातील 5 घाऊक आणि 7 किरकोळ दुकानांवर छापे टाकून 1 टन बेकायदा प्लास्टिक जप्त केले. त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाई करताना महापालिकेच्या महसुलात चक्क 82 हजार रुपयांची भर घातली. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये या पद्धतीने कारवाई करून 42 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. प्लास्टिक बंदीसंदर्भात त्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.