सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ घालून दिलेल्या कॅनडास्थित स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड (स्काॅ) संस्थेतर्फे रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सहकार्याने शुक्रवारी 1100 गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना बेड किट्सचे मोफत वितरण करण्यात आले.
टिळकवाडी क्लब येथे शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता बेड किट्स वितरण उपक्रमाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी कॅनडाहून आलेले जुली काॅर्ने, एम.एस. सॅन्डी, रिचीस क्लार्क, मार्सेली बाॅऊमन, रेफ सोडेर व फेट एम.एस. हे स्काॅचे सदस्य तसेच रोटरी क्लब ऑफ बेळगावचे पदाधिकारी उपस्थित होते. कॅनडा होऊन आलेल्या पथकातील सदस्यांच्या हस्ते यावेळी 6 ते 12 वर्षे वयोगटातील गोरगरीब शालेय मुलांना 1100 बेड किट्सचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रत्येक मुला – मुलीची नोंदणी करून घेऊन मुलांना शर्ट व हाफ (प्रत्येकी दोन जोड) आणि मुलींना पेटिकोट व फ्रॉक किंवा टी-शर्ट (प्रत्येकी दोन जोड) देण्यात आले. त्यानंतर सर्वच लाभार्थींना बेड किटचे वितरण करण्यात आले. या बेड किटमध्ये चादर, मॅट, मच्छरदानी, ब्लॅंकेट, स्वेटर, दप्तर, टॉवेल, रेनकोट आदी 15 उपयुक्त साहित्यांचा समावेश आहे. शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात बेळगाव विभागातील मण्णूर, उचगांव, गोजगा, हंदिगनूर, कडोली बेकिनकेरे, अतिवाड, बंबरगे, चलवेनट्टी व जाफरवाडी या गावातील गरीब शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनींना बेड किट्स देण्यात आली. याबद्दल मण्णूर येथील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम उघाडे यांनी स्काॅबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
जगभरातील गरीब मुलांना बेड किटचे मोफत वाटप करण्याचे स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड या संस्थेचे यंदाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने हा उपक्रम राबवताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावबाबत आम्ही अत्यंत समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया स्कॉच्या सदस्यांनी व्यक्त केली. स्कॉ संस्थेने रोटरी क्लब ऑफ बेळगावला आपल्या बेड किट उपक्रमात संलग्न करून घेतले आहे. त्यामुळे अनेक गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांपर्यंत रोटरी क्लब पोहोचू शकले याबद्दल बेळगाव रोटरीचे प्रमुख दिलीप चिटणीस यांनी समाधान व्यक्त केले आहे.
50 वर्षे जुनी स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड (स्काॅ) ही कॅनडा येथील 100% धर्मादाय संघटना दरवर्षी जगभरातील 6 ते 12 वर्षे वयोगटातील गोरगरीब गरजू शालेय मुलांना बेड किट्सचे मोफत मोफत वाटप करते. बेड कीट्स वितरण उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावचा एक वेगळा ट्रस्ट असून तो भारत सरकारची नोंदणीकृत आहे. केंद्र सरकारने या ट्रस्टला एफसीआरए नंबरही दिला आहे. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ बेळगावला कॅनडाकडून परकीय चलनामध्ये निधी उपलब्ध होत असतो, असे यावेळी सांगण्यात आले. आतापर्यंत रोटरी क्लब बेळगावद्वारे 65,000 हून अधिक बेड किट्सचे मोफत वाटप करण्यात आलेले आहे.