बांधकामातील सिमेंट काँक्रेटचा दर्जा खालावणारा आणि ताकद कमी करणारा “हनीकोम्बिंग”चा प्रकार स्मार्ट सिटी योजने अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या जुन्या पूना – बेंगलोर ( पी. बी.) रोड या रस्त्याच्या कामात आढळून आल्याचे फोटो व्हायरल झाल्याने बेळगावातील सोशल मिडियावर अलीकडे हा एक चर्चेचा विषय बनला असून टीकेची झोड उठली आहे.
निकृष्ट दर्जाचे कॉंक्रीटचे मिश्रण आणि ढिसाळ काम यामुळे हनीकोम्बिंग घडते. एखाद्या बांधकामांमध्ये 5 ते 10 टक्के जरी हनीकोम्बिंग झालेले असेल तरी हे बांधकाम निकृष्ट आणि अत्यंत सदोष असल्याचा शेरा मारला जातो, अशी माहिती बेळगावचे जाणकार नागरिक मंदार कोल्हापुरे यांनी दिली. बांधकामात हनीकोम्बिंग झालेले असेल तर ते लपवण्यासाठी कंत्राटदार पडलेल्या भेगा अथवा छिद्रे सिमेंटने बुजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामध्ये जादा वेळ तर जातोच शिवाय खर्चही वाढतो, असेही कोल्हापूर यांनी सांगितले.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जुन्या पी. बी. रोड रस्त्याच्या बांधकामांमध्ये जे हनीकोम्बिंग झाले आहे ते 90 टक्क्यांहून अधिक आहे. यावरून या नव्या रस्त्याचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे आहे याची कल्पना येऊ शकते. बेळगाव सध्या बहुतांश विकासकामे याच दर्जाची केली जात असल्याचा आरोपही मंदार कोल्हापूर यांनी केला आहे. शिल्पा एस. यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना अशी दर्जाहीन विकास कामे करून करदात्या सर्वसामान्य नागरिकांचा पैसा वाया घालविला जात असल्याचे सांगितले.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंची त्वरित दखल घेऊन पी. बी. रोड येथील रस्त्याची पाहणी केली असता त्याठिकाणी रस्त्याचे दोन कॉंक्रीट ब्लॉक सदोष असल्याचे आढळून आल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला ते तात्काळ बदलण्यास सांगण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दर्जेदारपणा टिकून राहावा यासाठी स्मार्ट सिटीच्या विकास कामांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच कामांमध्ये जर कोठे अडचण अथवा खोट आढळून आल्यास त्यांचे तात्काळ निवारण केले जात आहे.
जुन्या पी. बी. रोड या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची आम्ही संपूर्ण तपासणी केली आहे. या रस्त्यावर संबंधित दोन ठिकाणचे दोष ज्यांचे निवारण करण्यात आले आहे, ते वगळता या रस्त्याचे काम एकदम अचूक झाले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.