प्लास्टिक बंदीचा निर्णय आणि त्यावर होणार्या कारवाई, यामुळे काहीअंशी प्लास्टिक बंदी योग्य ठरली. ही समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिटवण्यासाठी जोरदार प्रयत्नही झाले. मात्र केवळ फोटोसाठी आणि औपचारिक म्हणून हा गाजावाजा करण्यात आला. मात्र तालुक्यात अजूनही प्लास्टिक टाकण्याचे प्रमाण जैसे थेच आहे. त्यामुळे यावर निर्बंध घालण्यासाठी पुन्हा एकदा मोहीम राबवण्याची गरज आहे.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत गावातील लोकांनी आणि व्यवसायिकांनी ही केले. गावात प्लास्टिक बंदी झाली पण ही प्लास्टिक बंदी फार काळ टिकली नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कचरा कुंडी मध्ये प्लास्टिक वाढतच चालला आहे. त्यामुळे समतोल बिघडत असला तरी याचे साऱ्यांना भान येणे गरजेचे आहे.
ज्या गावातून महामार्ग गेले आहेत त्या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे डोंगर साचलेले दिसतात. नागरिकांबरोबरच चारचाकी दुचाकी दुरुस्ती करणारे आणि इतर दुकानातील कचरा थेट रस्त्यावर आणून टाकण्याचे प्रमाण वाढले आहेत. याचा फटका मात्र पर्यावरणाला बसत असून याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
सांबरा, पिरनवाडी, काकती, मच्छे आदी गावातील रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्लास्टिक बंदीची मोहीम आखण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली असे काही दिसत नाही. अजूनही प्रत्येक दुकानात प्लास्टिकचा वापर होत असल्याने ही समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. याबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी लक्ष देऊन ही समस्या मिटवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.