मातीतील पारंपारिक कुस्तीमधील भारताचे वर्चस्व सिद्ध करताना दिल्लीच्या हिंदकेसरी पै नवीन मोर याने प्रतिस्पर्धी इराणचा वर्ल्ड चॅम्पियन पै उमर अली याला गुणांच्या आधारे पराभूत करून पिरनवाडी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान जिंकून उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांची शाबासकी मिळविली.
हजरत शहा सद्रोद्दिन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुसानिमित्त किरण वाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटनेतर्फे आज रविवारी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. या कुस्ती मैदानाची प्रतिष्ठेची प्रथम क्रमांकाची कुस्ती गुरु हनुमान आखाडा दिल्लीचा हिंदकेसरी पै नविन मोर याने जिंकली. या कुस्ती मैदानातील द्वितीय क्रमांकाची महान भारत केसरी पै सिकंदर शेख कोल्हापूर आणि चंदीगडचा भारत केसरी प्रदीप जीरकपुर यांच्यातील कुस्ती तुफानी झाली. अखेर दहाव्या मिनिटाला एक चाकी डावावर पै.सिकंदर शेख याने पै. प्रदीप जिरकपुर याला चीतपट करून विजय संपादन केला. कुस्तीमध्ये प्रारंभी प्रतिस्पर्धी मल्लांनी खडाखडी मध्ये सतर्कता व सावधानता बाळगत एकमेकांची ताकदअजमावली.त्यानंतर सिकंदर शेखने मुसंडी मारून प्रदीपला खाली घेतली परंतु प्रदीपने त्यातून सुटका करून घेतली त्यानंतर सिकंदर ने हनुमंती बैठक डाव टाकून प्रदीपला प्रदीप वर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रदीप नेतो धुडकावून लावला. अखेर 10 व्या मिनिटाला एक चाकी डावावर सिकंदर शेख याने प्रदीप जीरकपुर याला अस्मान दाखवून विजेतेपद मिळवले.
![Navin mor](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/02/FB_IMG_1581875470353.jpg)
हनुमान आखाडा दिल्लीचा हिंदकेसरी पै. नवीन मोर आणि इराणचा वर्ल्ड चॅम्पियन अमर अली पहिलवान या दोघांमधील लढत ही आजच्या जंगी कुस्ती मैदानचे मुख्य आकर्षण होते. तब्बल 112 किलो वजनाचा अमर अली आणि तुलनात्मकदृष्ट्या वजनाने कमी असलेला नवीन मोर (105 किलो) यांच्यातील लढत प्रारंभापासूनच उत्कंठावर्धक ठरली. तथापि दोन्ही मल्ल धुर्त व चालाख असल्यामुळे खडाखडीनंतर एकमेकाची ताकद आजमावन्याबरोबरच चौदंडी, गर्दन खेच आदी डाव आजमावत उभयतांनी एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वेळ गेल्याने पंच कमिटीच्या आदेशानुसार कुस्ती निकाली करण्यासाठी 5 मिनिटांचा जादा अवधी देण्यात आला. तथापि त्यामध्ये देखील प्रतिस्पर्धी मल्लांनी कुस्ती निकाली न केल्यामुळे गुणांच्या आधारावर विजेता मल्ल ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये पै. नवीन मोर यांची सरशी झाली. प्रारंभी गुणांच्या आधारावर आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा अलीने सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पडताना 6 व्या मिनिटाला पटात घुसणाऱ्या अलीला आपल्या ताब्यात घेऊन नवीन मोरेने ज्यादा गुण वसूल करण्याबरोबर आपले वर्चस्व सिद्ध केले. सदर प्रथम क्रमांकाच्या लढतीला अप्रत्यक्षरीत्या भारत विरुद्ध इराण असा रंग चढला होता. त्यामुळे नवीन मोर याला विजयी घोषित करण्यात येताच आखाड्यामध्ये एकच जल्लोष झाला.
तृतीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये दावणगिरीचा डबल कर्नाटक केसरी पै. कार्तिक काटे आणि कोल्हापूरचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. प्रकाश बनकर यांच्यातील तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती देखील रंगतदार झाली. तथापि दोन्ही मल्ल खमके निघाल्यामुळे ही लढत बरोबरीत सोडविण्यात आली.
आप्पाजी मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना पिरनवाडीतर्फे आज रविवारी आयोजित सदर आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान अतिशय रंगतदार झाले. सदर कुस्ती मैदानातील सर्व कुस्त्या निकाली होण्यावर भर देण्यात आला होता. भारतीय तंत्राने व शास्त्राने लढणारे मल्ल याठिकाणी पहावयास मिळाले. मान्यवरांच्या हस्ते या कुस्ती मैदानाचे उद्घाटन झाले. त्यानंतर आखाड्याचे उद्घाटन आप्पाजी मुचंडीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले व राकेश तळवार यांच्या हस्ते हनुमान फोटो पूजन झाले. शिवरायांचे फोटो पूजन एपीएमसीचे माजी अध्यक्ष यशवंत नेसरकर यांनी केले. आखाड्याचे उद्घाटन माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते झाले, तर पिरनवाडीच्या पंच मंडळींनी आखाड्याचे पूजन केले.
काटा जोड लढती झालेल्या या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी हनुमंत गुरव व अन्य पंचांनी पंच म्हणून काम पाहिले. सदर कुस्ती मैदानात बेळगावसह परिसरातील राजकीय नेते, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील अन्य मान्यवर मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष अप्पाजी मुचंडीकर व शिवसेनेचे बेळगाव तालुकाप्रमुख सचिन गोरले यांच्यासह छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि कुस्ती कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस खात्याने देखील सदर कुस्ती मैदान यशस्वीरित्या पार पडावे यासाठी सहकार्य केले. या कुस्ती मैदानात जवळपास 50हून अधिक लहान-मोठ्या कुस्त्या झाल्या. गेल्या बर्याच कालावधीनंतर अशा प्रकारचे उत्कंठावर्धक कुस्ती मैदान आयोजित करण्यात आल्याची प्रतिक्रिया कुस्ती शौकिनांमध्ये व्यक्त होताना दिसत होती. रविवारी हजारो कुस्ती शौकिनांनी पिरनवाडीच्या या कुस्ती मैदानाला हजेरी लावली होती.