उत्तर कर्नाटकातील कलबुर्गीच्या खजुरी गावातील 350 वर्षे जुन्या कोरानेश्वर संस्थेच्या मठाशी संलग्न गदग जिल्ह्यातील श्री श्री मुरुगराजेंद्र कोरानेश्वर शांतीधाम लिंगायत मठाने फक्त गप्पा न मारता जातीय सलोख्याचे जिवंत उदाहरण देताना आपला मठाचा भावी मुख्य पुजारी म्हणून एका मुस्लिम युवकाला नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मठ लिंगायत मठ परंपरेला छेद देऊन नवा आदर्श घालून देण्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गदग जिल्ह्यातील आसूती (ता. रोन) येथील श्री मुरुगराजेन्द्र कोरानेश्वरा मठाच्या भावी मुख्य पुजाऱ्याचे नांव दिवान शरीफ रहमानसाब मुल्ला असे आहे. सदर 36 वर्षीय दिवान शरीफ रहमान साहेब मुल्ला येत्या 26 फेब्रुवारी 2020 रोजी विधिवत मुख्य पुजारी म्हणून मठाचा कार्यभार हाती घेणार आहेत.
शरीफ बालपणापासून 12 व्या शतकातील सुधारक श्री बसवण्णा यांच्या शिकवणीने प्रभावित झालेले युवक असून जातीय सलोखा सामाजिक न्याय आणि सद्भावना याचे लहानपणापासूनच त्यांना बाळकडू मिळाले आहे. पूर्वी आसूती गावामध्ये श्री बसवन्ना यांच्या अनुषंगाने शिव प्रवचने होत असतं.
या शिव प्रवचनांनी प्रभावित होऊन शरीफ यांचे वडील दिवंगत रहिमतसाब मुल्ला यांनी आपली 2 एकर जमीन मठाच्या स्थापनेसाठी देऊ केली होती. आपली आसूती (ता. रोन) येथील श्री मुरुगराजेंद्र कोरानेश्वरा शांतीधाम मठाचा मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन शरीफ त्यांनी आपण भविष्यात सामाजिक न्याय आणि सद्भावनेने कार्यरत राहू अशी ग्वाही दिली आहे.