मनुष्य प्राण्यांच्या अतिक्रमणामुळे वनप्राण्यांना जंगल कमी पडत असल्याने ते प्राणी आता शहरी भागाकडे वळत असले तरी हे जंगल किती धोकादायक आहे याची प्रचिती त्यांच्यापैकी एका प्राणी प्रजातीला आली. या काँक्रेटच्या जंगलात एक दुर्देवी घटना घडली, जेंव्हा शास्त्रीनगर परिसरात माकडांच्या कळपातील माकडाचे एक पिल्लू हाय व्होल्टेज विद्युत तारेचा तीव्र धक्का बसल्याने लागलीच गतप्राण होऊन वरुन गटारीत कोसळले.
माकडांचा एक कळप आज सोमवारी शास्त्रीनगर परिसरात आला होता. कळपातील माकडे पोटपूजेसाठी काही मिळते का हे पाहण्यासाठी या झाडावरून त्या झाडावर या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारत होती. त्यावेळी दुर्देवाने या कळपातील माकडाच्या एका पिल्लाचा हाय व्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श झाला आणि विजेचा तीव्र धक्का बसल्याने लागलीच गतप्राण होऊन ते वरुन खाली गटारात कोसळले. तेंव्हा त्या मृत पिल्लाला कांही स्थानिक लोकांनी गटारीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असता संबंधित माकडांचा कळप लोकांच्या अंगावर धावून येऊ लागला. त्या पिल्लासाठी माकडांच्या कळपाने काही काळ धुमाकूळ घातला.
परिस्थिती गंभीर बनत चालल्यामुळे उपस्थित स्थानिक लोकांपैकी आदित्य बातूळकर यांनी लागलीच प्राणीमित्र गणेश दड्डीकर यांच्याशी संपर्क साधला व घडलेली घटना कळविली. दड्डीकर यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. त्याप्रसंगी माकडांचा धुमाकूळ चालूच होता. तेंव्हा दड्डीकर यांनी युक्ति लढवून आपले मित्र दौलत कणबरकर, मारूती बोकडे आणि एस. पी. जाधव यांच्या सहाय्याने फटाके वाजवून कळपाला पांगविण्याचा प्रयत्न केला, आणि संधी साधून त्या पिल्लाला गटारीतून बाहेर काढताच पुन्हा तो कळप हल्ला करू लागला. तेंव्हां त्या पिल्लाला कळपाच्या नजरेतून लपवत एका प्लास्टिक पिशवीमध्ये घालून गणेश दड्डीकर नजीकच्या घरात जाऊन लपून बसले.
माकडाच्या कळपाला हुलकावणी देऊन पिलाला गटारीतून बाहेर काढण्याचा सदर प्रकार जवळ जवळ एक तासाहून अधिक काळ सुरु होता. दरम्यान मदतीसाठी विशाल मुरकुटे यांनी आपली कार आणली आणि कळपाची नजर चुकवत त्या माकडाच्या पिल्लाला शहापूर स्मशानभूमी येथे नेऊन त्याठिकाणी मृत पिल्लावर रितसर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीप्रसंगी आकाश जांगळे, गणेश दड्डीकर, आदित्य बातूळकर, दौलत कणबरकर, एस. पी. जाधव, विशाल मुरकुटे, नवीन कुंटे, मारुती बोकडे, आकाश पाटील, नरेश शिंदे, पालनकर, आदी प्राणीमित्र उपस्थित होते.