पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने आपला पती होनीहाळ येथील दीपक पट्टणदार या जवानाचा निघृण खून केल्याची आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून स्वतः पोलिसात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की महिन्याभरापूर्वी होनीहाळ येथील दीपक चंद्रकांत पट्टणदार (वय 32 मूळ रा. सांबरा, सध्या रा. होनीहाळ) हा जवान बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याची पत्नी अंजली हिने पोलिसात दिली होती परंतु दीपक बेपत्ता झाला नसून त्याचा खून करण्यात आला असल्याची फिर्याद त्याच्या भावाने मारीहाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान बेपत्ता दिपकच्या भावाने दिलेली फिर्यादीत आणि पोलिसांना उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अंजली पट्टणदार हिचे आपला ड्रायव्हर प्रशांत पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते. यासंबंधांमध्ये पती दीपक याची अडचण होत असल्यामुळे अंजलीने त्याचा कायमचाच काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार गेल्या 28 जानेवारी रोजी अंजली आणि प्रशांत यांनी संगनमताने एका गाडीतून (क्र. जीए 07 एफ 6633) आपले मित्र प्रशांत व नवीन कंगेरी यांच्यासमवेत दिपकला गोडचींमलकी (ता. गोकाक) येथे फिरावयास नेले. त्याठिकाणी अंजलीसह प्रशांत व त्याच्या दोन मित्रांनी दीपक पट्टणदार याला यथेच्च दारू पाजली. त्यानंतर नजीकच्या जंगलात नेऊन त्याची निघृण हत्या केली. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून खुद्द अंजलीने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या 4 फेब्रुवारी मारीहाळ पोलिसात नोंदवली.
बेपत्ता जवान दीपक पट्टणदार याच्या भावाचा आपली वहिनी अंजली हिनेच घात केल्याची खात्री असल्यामुळे दिपकच्या भावाने पोलीस खुनाची फिर्याद दाखल केली आहे. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर अंजली व तिच्या प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांनी संगनमताने दीपकचा खून केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती सापडले असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
दीपक हा दिल्ली येथे लष्करात सेवा बजावत असून महिनाभरापूर्वी तो सुट्टीवर गावी आला होता. पत्नी अंजली हिच्या आग्रहावरून तो गेल्या 28 रोजी तिला घेऊन आपला ड्रायव्हर प्रशांत पाटील व त्यांच्या दोघा मित्रांसमवेत गोडचीनमलकी येथे फिरावयास गेला आणि त्यानंतर अचानक बेपत्ता झाला.
दरम्यान, गोडचींमलकी डॅम परिसरासह जंगल भागात बेपत्ता जवान दिपक पट्टणदार याचा मृतदेह सापडतो का? याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी मारीहाळ पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर या घटनेचा गांभीर्याने तपास करीत आहेत.