कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा हे काल गुरुवारी 78 वर्षांचे झाले असून याच दिवशी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने म्हादाई नदी पाणी वाटपासंदर्भात अधिसूचना जारी करून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट देऊ केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हादाई पाणी वाटपासंदर्भात निर्देश दिल्यानंतर केंद्र सरकारने म्हादाई जल विवाद प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. एकंदर या अधिसूचनेमुळे महादाई जलविवाद अखेर एका तार्किक निष्कर्षाला पोहोचला आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल गुरुवारी आपल्या कन्नडमधील ट्विटद्वारे पंतप्रधान यांना धन्यवाद दिले आहेत. “केंद्र सरकारने आज राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. काल आम्ही जलस्त्रोत आणि नदी विकास मंत्र्यांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार” असा जोशी यांच्या ट्वीटचा आशय आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने म्हादाई जल विवादाबाबत आपला अंतरिम आदेश काढला आहे. म्हादाई जलविवाद लवादाने म्हादाई नदीपात्रातील 13.42 टीएमसी पाणी (मलाप्रभा नदी पात्रात वळविण्यात येणाऱ्या 3.9 टीएमसी पाण्यासह) कर्नाटकात सोडले जावे असा आदेश 14 ऑगस्ट 2018 रोजी काढला होता.
आता आपल्या अंतिम निर्णयात लवादने महाराष्ट्रालाही 1.3 टीएमसी पाणी देऊ केले असून गोव्याला 24 टीएमसी पाणी मिळणार आहे. यूपीए-2 सरकारने गेल्या 2010 साली म्हादाई जलविवाद लवाद स्थापन केला होता. दरम्यान, आता कळसा-भांडुरा नाला प्रकल्पाद्वारे मिळणार्या म्हादाई नदीच्या 7.56 टीएमसी पाण्यामुळे हुबळी, धारवाड, बेळगाव आणि गदग जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.