एपीएमसी ते कंग्राळी खुर्दच्या नदीपर्यंत सध्या पाईप घालत आहेत. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला असून ग्राम पंचायत व नागरिकांना विश्वासात न घेता हे काम सुरु असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्टसिटी योजनेंतर्गत या कामांना चालना देण्यात आली तरी विकासाच्या नावावर अनेकांना त्रास देण्यात धन्यता मानत आहेत. मार्कडेय नदीपात्रात डेनेज मिश्रीत पाणी सोडण्याचा हा घाट असून नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.
लवकरच याबाबत लढा उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कंग्राळी गावाच्या विकासासाठी मागील ५० वर्षांपासून दुर्लक्ष केलेल्या सरकारने आता स्मार्टसिटी योजनेंतर्गत चालना दिली आहे. मात्र नागरिकांना त्रास करुन है । काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून एपीएमसी ते कंग्राळीपर्यंतचा रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मात्र पाईप लाईन घालण्याकडे सारेजण घाईगडबड करत असल्याचे दिसून येत आहे.
या पाईपमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत तर अजूनही काही जणांचे व्यवसाय बंद पडणार आहेत. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच दिसून येत नाही. कंग्राळी खुर्द गावचा रस्ता सध्या तरी मोठा प्रश्न बनून राहिला आहे. रस्त्याचे काम सोडून इतर पाईप घालून मार्कडेय नदी धोक्यात आणण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मार्कंडेय नदी ही अनेक गावांची जीवनदायीनी आहे. मात्र या नदीला ड्रेनेज मिश्रीत पाणी सोडून अनेकांना धोका पोहोचविण्याचे काम करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. नुकतीच महापूरामुळे ज्योतीनगर येथील पाणी कंग्राळी गावात शिरुन अनेकांचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा या पाईपव्दारे जर पाणी सोडल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. महत्वाचे म्हणजे ना ग्राम पंचायतीला आणि इतर नागरिकांना विश्वासात न घेता हे काम करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे जर रितसर परवानगी दाखविली नाही तर मोठे आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला आहे.
कंत्राटदाराचार प्रताप
संतगतीने कामाला चालना देवून आम्ही सरकारी कर्मचारी असल्याचे भासविणाऱ्या कंत्राटदाराने अनेक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन पाईप लाईनचे काम सुरु केले आहे . मात्र याविरोधात नागरिकांना पुसटशी कल्पनाही देण्यात आली नाही. कंत्राटदार आपली कामे संतगतीने सुरु ठेवली असली तरी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्यांचे मोठे नुकसानही केले आहे. त्यामुळे त्याचा हेकेखोरपणा दिसून येत आहे.