Monday, December 23, 2024

/

या जोडप्याचा झाला आदर्श विवाह

 belgaum

लग्न अथवा विवाह म्हणजे प्रेम, वचनबद्धता, विश्वास, आदर, परस्पर संवाद, संयम आणि सोबत यांचा आयुष्यभराचा प्रवास असतो. आपला विवाह मोठ्या थाटामाटात विलासी व्हावा असे प्रत्येक जोडप्याची स्वप्न असते. परंतु काही जोडपी अशीही असतात की ज्यांना साध्या पद्धतीचा तोही राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या ‘मंत्र मांगल्य’ संकल्पनेवर आधारित विवाह पसंद असतो. बेळगावचे चंद्रकांत गवाणी आणि विणा हे अशाच जोडप्यांपैकी एक असून जे आज शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी विवाहबद्ध झाले.

महेश फाउंडेशनच्या सभागृहात अनाथ मुलांच्या उपस्थितीत हा मंत्र मांगल्य विवाह सोहळा पार पडला. राष्ट्रकवी दिवंगत कुवेंपू यांची ‘मंत्र मांगल्य’ ही संकल्पना खर्चात टाकणारे ‘विलासी आणि प्रतिष्ठित’ विवाह टाळून लोकांना सोप्या व साध्या पद्धतीने विवाह करण्यास उद्युक्त करते. ही संकल्पना मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक क्षण अमूल्य असतो, तेंव्हा त्या क्षणाचे प्रदर्शन मांडू नका असे सांगते. महेश फाऊंडेशनचे समर्थक असलेले बेळगावचे चंद्रकांत गवाणी हे ‘मंत्र मांगल्य’ या संकल्पनेचा अवलंब करताना शुक्रवारी वाणी हिच्याशी साध्या पद्धतीने विवाहबद्ध झाले.

थाटामाटात लग्न करून पैसा खर्च करण्याऐवजी चंद्रकांत यांनी तो पैसा महेश फाउंडेशनच्या अनाथ मुलांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना ‘लग्न हे दोन आत्म्याचे मिलन असते, तेंव्हा त्यासाठी थाटामाटाची गरज नसते’ हा संदेश चंद्रकांत गवाणी यांनी समाजाला दिला. पारंपरिक विवाह पद्धतीवर जो अनावश्यक खर्च केला जातो तो खर्च सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी वापरला जावा, असे चंद्रकांत गव्हाणे यांचे प्रांजळ मत आहे.

महेश फाउंडेशनने शुक्रवारी स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मोठ्या उत्साहात चि. चंद्रकांत व चि.सौ.का. विणा यांच्या विवाहाची सर्व तयारी केली होती. वधूवरांना शुभाशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी या विवाहसमारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्योत्सव पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश भट शिवाजी कागणीकर, वीरण्णा मडिवाळ, दिनेश पाटील, श्रीमती आशा यमकनमर्डी, भावना हिरेमठ, शंकर चौगुले, महेश फाउंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव, व्यवस्थापक महेश्वर हंपीहोळी आदींसह शहरातील मान्यवर व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

आदर्शवत अशा या विवाह सोहळ्यामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे, जे सहसा लग्नसमारंभासारख्या सोहळ्यांना उपस्थित नसतात अशा अनाथ मुलांना या लग्नाचा आनंद लुटता आला. चंद्रकांत आणि वीणा यांच्या लग्नाप्रसंगी महेश फाउंडेशनच्या अनाथ मुलांना एखाद्या खास पाहुण्याप्रमाणे वागणूक देण्यात येत होती, जी आदर्शवत म्हंटली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.