नागरिकांची सुरक्षा आणि खबरदारीचे नियम धाब्यावर बसून सध्या शहरातील स्मार्ट सिटीची कामे अक्षरश: उरकली जात असून हा प्रकार भविष्यात धोकादायक ठरणार असल्याने नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
नागरिकांची सुरक्षा आणि खबरदारीचे नियम धाब्यावर बसून सध्या शहरातील स्मार्ट सिटीची कामे उरकली जात आहेत. विकास कामाची मार्गदर्शक तत्त्वे माहीत नसलेले कंत्राटदार आणि कामगार केबल्स व पाईपलाईन घालण्यासाठी शहरात हवी तशी खुदाई करताना दिसत आहेत. महांतेशनगर येथील कर्नाटक बँक नजीक घालण्यात येत असलेले केबलचे काम हे याचे जिवंत उदाहरण आहे. नियम धाब्यावर बसवून बेधडक खोदकाम केल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्या आणि ड्रेनेज पाईपलाईनचे नुकसान होत असून तात्पुरती दुरुस्ती करावी लागत आहे. आडव्या-तिडव्या घालण्यात येणाऱ्या प्राणघातक गॅस पाईप लाईन इलेक्ट्रिक वायर्स आणि ड्रेनेज पाईप हे जणू आगामी दुर्घटनेची चाहूलच देत आहेत. कारण भविष्यात जर कोणी जलवाहिनी दुरुस्ती अथवा इलेक्ट्रिक वायर टायपिंगसाठी संबंधित ठिकाणी खुदाई केल्यास जमिनीखालील गॅस अथवा इलेक्ट्रिक वाहिन्या फुटून मोठी दुर्घटना घडू शकते. सध्या सुरू असलेले यास पाईपलाईन आणि इलेक्ट्रिक केबल घालण्याचे काम म्हणजे नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
खुदाईमुळे यापूर्वी बऱ्याचदा इस्कॉनच्या केबलचे नुकसान झाले आहे. आता तर या केबल्सच्या जोडीला गॅस पाईप लाईन्स आल्या आहेत. याची वेळीच गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे. यावर एकमेव सुरक्षित मार्ग म्हणजे धोकादायक केबल आणि पाईपलाईन हाताळण्यासाठी बंदिस्त सिमेंट नाले बनवावेत जे देखभालीसाठी वरचेवर उघडता येऊ शकतील. मात्र सद्य परिस्थिती पाहता आमच्या लोकांना नागरिकांच्या सुरक्षेचे आणि मानवी जीवाचे महत्त्व केंव्हा कळणार देव जाणे?