दगडांनी भरलेला सुमारे तीन ट्रक लोड इतक्या प्रचंड वजनाचा क्वारीतील हूपर अंगावर कोसळल्याने घडलेल्या भीषण दुर्घटनेत क्वाॅरी मालकाचा दगडांखाली चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथे घडली.
हणमंत लमानी (वय 50 सध्या रा. कल्लेहोळ, मूळचा रामदुर्ग) असे दुर्घटनेत ठार झालेल्या क्वाॅरी मालकाचे नाव आहे. हणमंत लमानी याने कल्लेहोळ येथे नुकतीच नवी क्वाॅरी खरेदी केली होती. आपल्या मालकीच्या या क्वाॅरीमधील काम कसे काय सुरू आहे हे पाहण्यासाठी तो मंगळवारी सायंकाळी क्वाॅरीवर गेला होता. त्याप्रसंगी क्वाॅरीमध्ये दगड काढण्याचे काम सुरू होते. हे काम पहात असताना दगड भरलेला हूपर अचानक निखळून हणमंत याच्या अंगावर कोसळला. अगदी क्षणार्धात हा प्रकार घडल्यामुळे हणमंत लमानी याला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही आणि जवळपास तीन ट्रक लोड इतके दगड भरलेला हुपर त्याच्या अंगावर कोसळला. परिणामी हणमंत रक्ताच्या थारोळ्यात दगडाखाली गाडला जाऊन जागीच गतप्राण झाला.
सदर प्रकार लक्षात येताच क्वाॅरीतील मजूरांनी घटनास्थळी धाव घेऊन हणमंत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तथापी हणमंताच्या अंगावर इतके दगड कोसळले होते की ते काढण्यासाठीच जवळपास तब्बल 4 तासाचा अवधी लागला, या कालावधीत हनुमंत लमानी याचे प्राण गेले होते.
सदर घटनेचे वृत्त समजताच काकती पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तसेच हणमंत लमानी याचा मृतदेह शवचिकीत्सेसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला. आज बुधवारी सकाळी हनुमंत लमानी याचा मृतदेह शवचिकित्सेनंतर त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. उपरोक्त घटनेची काकती पोलिस स्थानकात नोंद झाली असून पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी हे अधिक तपास करीत आहेत.