मराठी भाषा दिनानिमित्त जीवन विद्या मिशन शहापूर उपकेंद्रातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आज रविवारी उत्साहात पार पडले.
श्री गंगापुरी महाराज मठ, कोरे गल्ली – शहापूर येथे सदर चित्रकला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी 10 ते ते 11.30 वाजेपर्यंत इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शहरातील विविध शाळांच्या 458 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेऊन आपली चित्रकला सादर केली. चित्रकला स्पर्धेनंतर दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत 168 मुलामुलींनी भाग घेतला होता.
संगीत खुर्ची स्पर्धेनंतर दुपारी 3.30 वाजता महिलांसाठी “होम मिनिस्टर” या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धात्मक कार्यक्रमात पंचवीस महिलांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत विविध मनोरंजनात्मक आणि महिलांच्या कौशल्याचा कस पाडणाऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या. हा होम मिनिस्टर रंगतदार कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. चित्रकला स्पर्धा आणि संस्कृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन विद्या मिशन शहापूर उपकेंद्राच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.