मूळचे कोल्हापूर येथील आणि कामानिमित्त बेळगाव येथेही वास्तव्यास असणारे सुप्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते अश्किन आजरेकर यांच्या सुविद्य पत्नी निलोफर आजरेकर यांची कोल्हापूर (महाराष्ट्र) शहराच्या नूतन महापौरपदी निवड झाली आहे.
आपल्या पती प्रमाणेच निलोफर या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सुपरिचित असून नगरसेवक या नात्याने त्यांनी आपल्या प्रभागात अनेक विकास कामे राबविली आहेत. कोल्हापुरातील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. कोल्हापूर प्रमाणेच आपले पती अश्किन यांच्या मदतीने निलोफर या बेळगावमध्ये देखील विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. दरवर्षी त्या आपल्या मुलाचा वाढदिवस अनाथ, एचआयव्ही बाधित आणि असहाय्य मुलांसमवेत साजरा करतात हे विशेष होय.
अशकीन यांच्या कडे किल्ला तलाव देखरेकीचे काम होते त्यावेळी पासून ते बेळगावात आहेत.
कोल्हापुरातील मोहंमेडन एज्युकेशन सोसायटीचे (1905 साली स्थापन झालेले मुस्लिम बोर्डिंग) गेली 35 वर्षे चेअरमन असलेले आणि सामाजिक एनजीओ अजरेकर फाऊंडेशनचे संस्थापक गणी अजरेकर हे निलोफर यांचे सासरे आहेत. आपल्या सासऱ्यांसह पती अश्कीन आणि मेव्हणे अश्पाक अजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलोफर यांचे सामाजिक कार्य सुरू असते.
निलोफर आजरेकर यांची कोल्हापूरच्या नूतन महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या शेकडो समर्थक व चाहत्यांनी विजयोत्सव साजरा केला. यामध्ये बेळगावातील मान्यवर मंडळींचा देखील सहभाग होता. महापौरपदी निवड झाल्यानंतर निलोफर यांची कोल्हापूर शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.