सोशल मीडियाचा दुरुपयोग करताना देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या हुबळी येथील जामिनावर मुक्त झालेल्या केएलई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी पुन्हा गजाआड केले असून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू झाली आहे.
पोलिसांनी गजाआड केलेल्या विद्यार्थ्यांची नांवे अमीर, तालिब व वाशिम अशी आहेत. देशातील पुलवामा हल्ल्याच्या घटनेला आता एक वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित युवकांनी पाकिस्तानी लष्कराचे पार्श्वसंगीत असणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला असून त्यामध्ये खाई ये कसम, खाई ये कसम, सून ले दुश्मन सभी है, सून ले दुश्मन भी है दिल की सदा पाकिस्तान जिंदाबाद! पाकिस्तान जिंदाबाद!! अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी देशविरोधी कारवाई केल्याचा आरोप ठेवून संबंधित विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हुबळी येथील केएलई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तीन विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला याबाबतची माहिती मिळताच बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी हुबळी येथील केएलई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य बसवराज अनामी यांची भेट घेऊन जाब विचारला. तसेच संबंधित विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच हुबळी पोलिसानी संबंधित विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
अमीर तालिब व बाशीम या तीन मुस्लिम विद्यार्थ्यांना सरकारी कोट्यातून हुबळी येथील केएलई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. सदर तीनही विद्यार्थी भविष्यात उत्तम अभियंते बनू शकतात. तथापि आपल्या उमेदीच्या काळात हे तरुण देश विरोधी कारवाईत गुंतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर विद्यार्थ्यांनी देशविरोधी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान पुलवामा हल्ल्याच्या दशकपूर्ती दिनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या सदर तीन काश्मीरी विद्यार्थ्यांची रविवारी पोलिसांनी सुटका केली होती. तथापि उत्तर कर्नाटकातील बजरंग दल व इतर हिंदू संघटनांनी याच्या निषेधार्थ आवाज उठवल्याने पोलिसांनी रविवारी सकाळी संबंधित आरोपींना पुन्हा अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संबंधित आरोपींना 2 मार्च 2020 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. धारवाडचे पोलीस अधीक्षक आर. दिलीप यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या खटल्यात देशविरोधी कृत्यात सहभागी होणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय हुबळी बार असोसिएशनने घेतला आहे.