Sunday, December 29, 2024

/

अखेर जनावरांसाठी खुला करण्यात आला कणबर्गी तलाव

 belgaum

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेल्या कणबर्गी तलावाच्या दोन्ही बाजूचे रस्ते जनावरांना पाणी पिण्यासाठी खुले ठेवण्याचे आश्वासन देण्याबरोबरच मातीचा भराव व लोखंडी बार टाकून बंदावस्तेत ठेवलेले हे रस्ते चार दिवसांपूर्वी खुले करण्यात आल्याने कणबर्गीवासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

कणबर्गी येथील तलावाच्या दोन्ही बाजूला जनावरांना ये जा करण्यासाठी रस्ता सोडण्यात यावा अन्यथा कणबर्गी येथील सर्व जनावरे बुडा कार्यालय आवारात आणून सोडले जातील असा इशारा कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी कणबर्गी येथील युवा नेते व शेतकरी किसन सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली 8-10 दिवसापूर्वी दिला होता.

Kanbargi farmers happy
Kanbargi farmers happy

सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. कणबर्गी येथे देखील जी विकास कामे राबविण्यात येत आहेत, त्याला कणबर्गीवासियांचा विरोध नाही. परंतु कणबर्गी तलावाच्या दोन्ही बाजूला जनावरांसाठी रस्त्याची जागा मोकळी सोडावी अशी गेल्या दोन वर्षापासून मागणी केली जात आहे. परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नव्हती. कणबर्गी गावात सुमारे दोन हजारहून अधिक पाळीव जनावरे आहेत. यामध्ये बकऱ्यांची संख्या अंदाजे 2 हजार आहे. या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरे धुण्यासाठी कणबर्गी तलावाचा वापर केला जातो. या परिसरात अन्य दोन तीन तलाव आहेत, परंतु पावसाळा वगळता अन्य मोसमात ते कोरडे ठणठणीत असतात. त्यामुळे कणबर्गी येथील शेतकऱ्यांना जनावरांसाठी कणबर्गी तलावावर अवलंबून राहावे लागते. सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या परिसरात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. ही विकास कामे करताना कणबर्गी तलावाच्या दोन्ही बाजूला रस्त्यासाठी किमान 30 फूट जागा सोडावी, जेणेकरून या रस्त्यावरून जनावरांना तलावाकडे नेता येईल. कणबर्गी येथील जनावरे या तलावातील पाणी पितात तसेच तलावातून पोहून दुसऱ्या बाजूला असणाऱ्या रस्त्याने गावाकडे जातात. तेंव्हा जर या तलावाच्या चोहोबाजूने विकास कामे केल्यास जनावरांना ये – जा करण्यासाठी रस्ता शिल्लक राहणार नाही. आणि त्यांना या तलावापासून वंचित राहावे लागेल. यासाठी तलावाच्या दोन्ही बाजुला रस्त्यासाठी जागा सोडावी, अशा आशयाचे निवेदन 8-10 दिवसापूर्वी बुडाला देण्यात आले होते.

या निवेदनाची दखल घेऊन चार दिवसापूर्वी कणबर्गी आणि परिसरातील जनावरांना पाणी पिण्यासाठी तसेच जनावरे धुण्यासाठी कणबर्गी तलावाच्या दोन्ही बाजूला ये – जा करण्यासाठी असणारे बंद केलेले रस्ते खुले करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या कामांतर्गत सदर रस्ते मातीचा भराव आणि लोखंडी बार टाकून बंद करण्यात आले होते तथापि सध्या या ठिकाणचे लोखंडी बार हटविण्यात आले असून रस्ता बंद करण्यासाठी टाकण्यात आलेला भराव येत्या 10 दिवसात काढण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अभियंत्याने दिले आहे. यामुळे कणबर्गीवासियांमध्ये हे समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.