बेळगावच्या जलतरणपटू ज्योती पी. होसट्टी यांनी वडोदरा गुजरात येथे हे नुकत्याच संपन्न झालेल्या 3 ऱ्या नॅशनल मास्टर्स गेम्स – 2020 या राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करताना तीन सुवर्ण पदके पटकाविली आहेत. या कामगिरीमुळे ज्योती होसट्टी यांची यावर्षाखेर ऑस्ट्रेलियामध्ये आणि त्यानंतर पुढील वर्षी जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
मास्टर्स गेम्स फेडरेशन इंडिया यांच्यातर्फे गेल्या 5 ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये ते वडोदरा गुजरात येथे तिसर्या नॅशनल मास्टर्स ग्रीन गेम्स – 2020 या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवातील महिलांच्या 40 वर्षावरील वयोगटामध्ये ज्योती होसट्टी यांनी 50 मी. बॅकस्ट्रोक जलतरण शर्यतीसह 100 मी. व 200 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. या कामगिरीमुळे ज्योती यांची गोल्डकोस्ट ऑस्ट्रेलिया येथे येत्या 6 ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होणाऱ्या ‘पॅन पॅसिफिक गेम्स’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे कनसाई जपान येथे ते पुढील वर्षी मे 2021 मध्ये होणाऱ्या ‘वर्ल्ड मास्टर गेम्स’ मध्ये देखील त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
आजपर्यंत अशा आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या ज्योती होसट्टी या बेळगाव जिल्ह्यातील पहिल्या जलतरणपटू आहेत, तसेच त्यांच्या वयोगटात जलतरणामध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. गेल्या नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि त्यांची तिसऱ्या नॅशनल मास्टर्स गेम्स साठी निवड झाली होती. ज्योती होसट्टी या कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम पाहतात. जेएनएमसी स्विमिंग पूलमध्ये जलतरणाचा सराव करणाऱ्या ज्योती होसट्टी यांना जलतरण प्रशिक्षक सुधीर जोशिलकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल ज्योती पी. होसट्टी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान, 3 ऱ्या नॅशनल मास्टर्स गेम – 2020 स्पर्धेमध्ये कर्नाटक संघाने सर्वाधिक 1449 गुण मिळून प्रथम क्रमांक मिळविला. कर्नाटक मागोमाग महाराष्ट्र (1091) आणि आसाम (528) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागेल. उत्तराखंडला सर्वाधिक कमी म्हणजे फक्त 1 गुण संपादन करता आला. याचार राज्यांसह यजमान गुजरात, केरळ, पंजाब, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, तेलंगणा, ओडीसा आदी देशातील 21 राज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.