पुणे महाराष्ट्र येथील केअर फोर यू या बिगर सहकारी संघटनेच्या अर्थात एनजीओच्या 25 शिक्षक आणि 90 विद्यार्थ्यांनी शनिवारी बेळगावच्या ज्युनियर लीडर विंगला भेट देऊन माहिती घेतली.
दुर्लक्षित तसेच खासकरून अनाथ मुलांना भारतीय लष्करातील साहसीजीवन आणि आव्हानांची माहिती मिळावी तसेच त्यांच्यात लष्करात भरती होण्याची प्रेरणा जागावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ज्युनियर लीडर विंग येथील सापांना हाताळण्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून केअर फोर यू एनजीओचे विद्यार्थी आणि शिक्षक स्तिमित झाले होते.
जे. एल. विंग मधील स्नेक हॅन्डलींगसह रॉक क्राफ्ट, बॅटल ऑबस्टेकल्स आदींचे अत्यंत खडतर प्रशिक्षण एखाद्या युवकाला एका समर्थ पुरुषात कसे रूपांतरित करू शकते याचा अनुभव केअर फोर यूच्या सदस्यांनी घेतला.
‘क्रिडल ऑफ ज्युनिअर लीडरशिप’ म्हणून ओळखले जाणारे बेळगावचे ज्युनियर लीडर विंग हे केंद्र भारतीय लष्कराचे प्रतिष्ठेचे प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी भारतीय लष्करातील ‘कमांडर कोर्स’ आणि ‘कमांडो कोर्स’ या अत्यंत उच्च दर्जाच्या प्रोफेशनल कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते.