नियंत्रण सुटल्याने भरधाव कारगाडी रस्त्याशेजारी दगडाला धडकून पलटी झाल्याने घडलेल्या अपघातात हुबळी – धारवाड पश्चिम मतदार संघाचे आमदार चंद्रकांत बेल्लद आणि त्यांचे कुटुंबीय सुदैवाने सहीसलामत बचावल्याची घटना बैलूर क्रॉसनजीक आज मंगळवारी दुपारी घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हुबळी – धारवाड पश्चिम मतदार संघाचे आमदार चंद्रकांत बलद हे सहकुटुंब गोव्याला गेले होते. गोव्याहून आज मंगळवारी कुटुंबासमवेत ते आपल्या टाटा हेक्सा कारगाडीने (क्र. केए 63 एम 2028) परतीच्या प्रवासाला निघाले होते. यावेळी आमदार बेल्लद स्वतः कार गाडी चालवत होते.
गोव्याहून बेळगावमार्गे धारवाडला येत असताना दुपारी 4च्या सुमारास जांबोटी – चोर्ला मार्गावरील बैलुर क्रॉसनजीक अनावधानाने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्याशेजारी दगडाला धडकून पलटी झाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्याचप्रमाणे कार गाडीमधील कोणालाही गंभीर इजा झाली नाही.