नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला कांही राष्ट्रद्रोह्यांकडून केवळ स्वार्थासाठी विरोध केला जात असून अशा लोकांना भीक घातली जाऊ नये, असे स्पष्ट मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी व्यक्त केले.
हिंदु जनजागृती समितीच्यावतीने रविवारी सायंकाळी धर्मवीर संभाजी महाराज उद्यान, महाद्वार रोड, बेळगाव येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा उस्फूर्त प्रतिसाद पार पडली. या सभेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता कृष्णमूर्ती बोलत होते. भारताच्या कोणत्याही कानाकोपर्यात आपल्याला हिंदु धर्माशी संबंधित गोष्टी आढळतील. यामुळे भारत हा एकसंघ असल्याने ‘भारत तेरे तुकडे…’ अशा घोषणा केवळ स्वप्नवतच रहातील. या देशातील कानाकोपर्यात हिंदूंवर कुठेही अन्याय, अत्याचार होत असेल तर हिंदु विधीज्ञ परिषद साहाय्य देण्यास सिद्ध आहे, असेही अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सुमित सागवेकर आणि सनातन संस्थेचे कार्तिक साळुंखे यांनी देखील मार्गदर्शनपर विचार मांडले. प्रारंभी शंखनादानंतर अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती वासुदेव छत्रे गुरुजी आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा जिल्हा समन्वयक हृषिकेश गुर्जर आणि सरिता मुगळी यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. साधना जरळी यांनी केले. या सभेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेप्रसंगी धर्माभिमानी हिंदूंसाठी येत्या 16 फेब्रुवारी 2020 या दिवशी श्री विश्वकर्मा देवस्थान, एस्.पी.एम्. रोड, बेळगाव येथे सायंकाळी 5.30 वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.