भर रस्त्यातील रखडत चाललेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना पुष्पहार घालण्याद्वारे ‘गांधीगिरी’ करत आज गुरुवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटी योजनेची कामे नियोजनबद्धरित्या दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण केली जावीत, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
शहरातील स्मार्ट सिटीची कामे रखडत चालली असून काही ठिकाणी ती अर्धवट अवस्थेत असल्याने धोकादायक बनली आहेत. याच्या निषेधार्थ तसेच सदर कामे दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येणार होते. तथापि पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे सुरेंद्र अनगोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. या सर्वांनी मोर्चा जेथून निघणार होता त्यात ध. संभाजी चौकापासून ते कॉलेज रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणाऱ्या मार्गावर स्मार्ट सिटीची जी-जी कामे रखडत अर्धवट अवस्थेत पडली आहेत, त्यांना पुष्पहार घालून आपला निषेध नोंदविला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेले निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी दीपक पांडे, दुर्गेश मेत्री, महेश पाटील, सुशांत चव्हाण, रोहन हरगुडे, ज्योतिबा पाटील आदी उपस्थित होते.
बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी योजनेची कामे संथ गतीने रखडत सुरू असल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी ही विकास कामे केली जात असल्यामुळे यापैकी काही कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. सदर अर्धवट अवस्थेतील विकास कामे काही ठिकाणी मृत्यूचा सापळा ठरताहेत कोणतेही ताळतंत्र न ठेवता विकास कामे राबविण्यात येत असल्यामुळे काही ठिकाणी ती निकृष्ट दर्जाची होत आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट सिटी लिमिटेड बेळगावकडून सध्या शहरात सर्वत्र हाती घेण्यात आलेल्या विकास कामांपैकी बहुतांश कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
एकाच वेळी अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्यामुळे बहुतांश रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. यामुळे लहान-मोठे अपघात घडत असून वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणामुळे बहुतांश ठिकाणी एकेरी वाहतूक केली जात आहे. या एकेरी वाहतुकीमुळे तसेच अर्धवट अवस्थेतील दुभाजकांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. अर्धवट अवस्थेतील रस्ते, गटारी शहरात आतापर्यंत तिघाजणांचे बळी गेले आहेत. उखडलेल्या आणि उंच-सखल रस्त्यांमुळे दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनचे एक्सेल, बंपर आदींचे नुकसान होत असल्याने वाहनचालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकंदर स्मार्ट सिटीची विकास कामे नागरिकांच्या सोयीची होण्याऐवजी गैरसोयीची होत आहेत. हा प्रकार थांबून संबंधित विकास कामे लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे वर्षभरात खराब झालेल्या गोगटे सर्कलनजीकच्या रेल्वे फ्लायओव्हर ब्रीजच्या बांधकामाची सखोल चौकशी केली जावी, तसेच दलित बांधवांसाठी असलेली सरकारी आश्रय योजनेतील घरे निर्वासित होऊन बेळगावात आलेल्यांना न देता बेळगावच्या स्थानिक दलितांनाच दिली जावीत, अशा आशयाचा तपशील सुरेंद्र अनगोळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.