मोटार सायकलवरुन शेताला जाणाऱया शेतकऱयाला अडवून त्याला चाकुचा धाक दाखवून मोबाईल संच व रोकड लुटल्याच्या आरोपावरुन चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. मुरगोड (ता. सौंदत्ती) पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
15 दिवसांपूर्वी मुरगोड जवळ ही घटना घडली होती. महेश मेळय्या हिरेमठ (वय 50) हे मोटार सायकलवरुन शेताकडे जात होते. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल अडवून 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल संच व 15 हजार रोख रक्कम लुटण्यात आले होते
या संबंधी मुरगोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता मुरगोड पोलिसांनी संशयितांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे. त्यांच्या जवळून 8 मोबाईल संच, दोन मोटार सायकली व 7 हजार 800 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. रामदुर्गचे पोलीस उपअधिक्षक शंकरगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदत्तीचे मंडल पोलीस निरीक्षक एम. आय. नडवीनमनी, मुरगोडचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
रविंद्र लक्काप्पा शिनोबी (वय 19, रा. ओबलदिन्नी, ता. सैंदत्ती), देविंद्र विठ्ठल सन्नतम्मण्णावर (वय 19), श्रीशैल विष्णू होंडप्पण्णवर (वय 21), यमनाप्पा यल्लनायक कडेमनी (वय 21, तिघेही रा. नुग्गानट्टी, ता. सौंदत्ती) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत.