“मरावे परी कीर्तिरूपे उरावे” असे संत वचन आहे या वचनाला जागून आपण प्रत्येक जण नेत्रदान, रक्तदान याप्रमाणेच देहदानाचा संकल्प करू शकतो. देहदानामुळे अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ होऊन त्यांचे जीवन सुखकर होऊ शकते. यासाठी अवयवदान खूप महत्त्वाचे आहे. मृत्यूनंतर आपण आपला देह दान करावा असा संकल्प केल्यास अवयवदानाची चळवळ वाढीस लागेल आणि समाजाला त्याचा फायदा होईल, असे मत महाराष्ट्रातील द फेडरेशन ऑफ ऑर्गण अॅन्ड बाॅडी डोनेशन संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांनी व्यक्त केले.
मरणोत्तर अवयवदानाची चळवळ वाढीस लागून समाजाला त्याचा फायदा व्हावा या हेतूने द फेडरेशन ऑफ ऑर्गण अॅन्ड बाॅडी डोनेशन संस्थेतर्फे आयोजित नाशिक ते बेळगाव अवयवदान जनजागृती पदयात्रा अभियान बेळगावमध्ये दाखल झाले. यानिमित्त आज शनिवारी सायंकाळी वाड्मय चर्चा मंडळ येथे जनजागृतीपर सभा झाली. याप्रसंगी पुरुषोत्तम पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्या मृत्यूनंतर आपले काही अवयव दुसऱ्याला उपयोगी पडू शकतात अवयव रोपणाच्या प्रतिक्षेतमध्ये आज हजारो रुग्ण आहेत. आपल्या देहदानामुळे त्यांना त्याचा फायदा होणार आहे. दान सत्पात्री असले पाहिजे, त्यादृष्टीने अवयव दान हे खूप महत्त्वाचे दान आहे, असे त्यांनी सांगितले.
अवयवदानाचा अर्ज भरावा लागतो. सदर अर्ज भरल्याचे प्रमाणपत्र घरामध्ये दर्शनी भागाला लावणे महत्त्वाचे आहे. मृत्यूनंतर 6 तासाच्या आत अवयव काढून घेण्याची प्रक्रिया डॉक्टर पूर्ण करतात अवयवदान आनंतर कोणतेही विद्रुपीकरण होत नाही तशी काळजी डॉक्टर घेतात. त्यामुळे समाजामध्ये अवयवदानाची चळवळ वाढीस लागणे आवश्यक आहे, असेही पुरुषोत्तम पवार म्हणाले.
सदर जागृती सभेस जायन्ट्स आय फाउंडेशन, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन), जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी, वाङमय् चर्चा मंडळासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
गेल्या 5 जानेवारी रोजी नाशिक येथून सुरू झालेल्या अवयवदान जागृती पदयात्रेचे आज बेळगावात आगमन झाले. श्रीनगर येथील उद्यानापासून सदर पदयात्रा सदाशिवनगर मार्गे जे. एन. मेडिकल कॉलेज येथे आली. तेथे पदयात्रेतील सदस्यांचे अनुभवकथन झाले, तर सायंकाळी किर्लोस्कर रोड येथे जनजागृती सभा पार पडली. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना द फेडरेशन ऑफ ऑर्गण अॅन्ड बाॅडी डोनेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्यासह अन्य सदस्यांनी अवयवदान चळवळीबद्दल माहिती दिली. तसेच यापैकी काहींनी आपले स्वानुभवही कथन केले.