गेल्या 2014 सालानंतर कर्नाटक राज्य वायव्य परिवहन महामंडळाने बस तिकीट दरवाढ केली असून काल गुरुवार सकाळपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिवहन मंडळाच्या निर्णयामुळे शहर व ग्रामीण भागातील बस तिकीट दरात प्रति स्टेज सरासरी 1-2 रुपयांनी वाढ केली गेली आहे.
नव्या दरवाढी नुसार बेळगाव शहर व ग्रामीण भागातील बस तिकीट दरात सरासरी 1 ते 2 रुपयांची वाढ झाली असली तरी पहिल्या स्टेजचा दर बदललेला नाही. त्यामुळे पहिल्या तीन किलोमीटरसाठी 5 रुपये तिकीट आकारणी होणार आहे. सीबीटीपासून कोर्ट गांधीनगर अशा ठिकाणी पहिल्या स्टेजचे दर 5 रुपये राहतील. मात्र त्यापुढील स्टेज साठी थेट 2 रुपयांची वाढ केली आहे. सीबीटीपासून रेक्स, आरएलएस, धर्मवीर संभाजी चौकापर्यंत जुना दर 8 रुपये होता त्यात 2 रुपये वाढ होणार असून आता या अंतरासाठी प्रवाशांना 10 रुपये मोजावे लागणार आहेत.
वायव्य परिवहन महामंडळाने यावेळी 12 टक्के दरवाढ केली आहे. यापूर्वी शेवटची बस तिकीट दरवाढ 2014 मध्ये झाली होती. त्यानंतर डिझेल दरात वाढ होऊनही बस प्रवास महागला नव्हता. गेल्यावर्षी काँग्रेस – निजद युतीच्या सरकारने तिकीट दरवाढ केली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ही दरवाढ रद्द केली होती.
परिवाहन मंडळाचा प्रस्ताव तसेच 6 वर्षात दरवाढ न झाल्याचा विचार करून तसेच डिझेल दरवाढ आणि कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन यामुळे परिवहन मंडळ तोट्यात चालले असल्यामुळे शासनाने अचानक निर्णय घेऊन बस दर वाढविले आहेत.