एक लाख रुपयांच्या असली चलनी नोटा द्या त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला तीन लाख रुपये देतो असे सांगून बनावट नोटा खपणार या पाच जणांच्या एका आंतरराज्य टोळीला जिल्हा गुन्हा अन्वेषण खात्याच्या अर्थात डीसीबी पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून 23 लाख 88 हजार रुपयांच्या बनावट आणि 12 हजार रुपयांच्या असली चलनी नोटांसह दोन वाहने, मोबाईल असा अन्य मुद्देमाल जप्त केला आहे.
अमर शंकर आंबेकर (वय 27 रा. रुईकर कॉलनी कोल्हापूर), धैर्यशील बाबुराव पाटील (वय 42 रा. बल्लोबाचळी कागल कोल्हापूर), अशोक शंकर केली (वय 50 रा. कल्लोळ चिक्कोडी), राजेश मारुती मोहिते (वय 48 रा. गट्टीगल्ली निपाणी) आणि बाबासो वसंत पाटील (वय 31 रा. बल्लोबाचळी कागल कोल्हापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीबी पोलीस निरीक्षक परेश दोडमनी व निंगनगौडा पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपरोक्त कारवाई केली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेले याबाबतची अधिक माहिती अशी की, हुक्केरी तालुक्यातील कमतगी क्रॉस नजीक बोलेरो जीप (क्र. एमएच 45 ई 7777) आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्र. एमएच 12 ईजी 2070) या वाहनांमधून बनावट नोटांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार होणार असल्याचे समजताच डीसीबी पोलीस निरीक्षक परेश दोडमनी व निंगनगौडा पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला. त्यावेळी आरोपींपैकी काहीजणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तथापि पोलिसांनी शिताफीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
याप्रसंगी पोलीस झडतीत आरोपींकडून दोन्ही वाहनांमध्ये प्लास्टिक पॅकींग केलेले नोटांचे 12 बंडल आढळून आले. याबंडलच्या दोन्ही बाजूच्या दर्शनी भागावर खरी चलनी नोट ठेवून बंडलच्या मधल्या भागांमध्ये बनावट नोटा व कागदाचे तुकडे भरण्यात आल्याचे आढळून आले. पोलीस चौकशीत सदर आरोपी 1 लाख रुपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या मोबदल्यात 3 लाख रुपयांच्या नोटा देतो, अशी बतावणी करून बनावट नोटा खपवत असल्याचे उघडकीस आले. त्याचप्रमाणे सापडलेल्या नोटांच्या बंडलमधील प्रत्येक बंडल हा 2 लाख रुपयाचा असल्याचे आरोपींकडून सांगितले जात होते. प्रत्यक्षात दर्शनी भागावरील नोटा वगळता या बंडलमधील सर्व नोटा बनावट असतील याची व्यवस्था करण्यात आली होती.
पोलीस कारवाईत पाचही आरोपींकडून 23 लाख 88 हजार रुपयांच्या बनावट नोटासह 12 हजार रुपयांच्या खऱ्या चलनी नोटा, दोन वाहने आणि 5 मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संकेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.