बनावट नोटा चलनात आणणाऱ्या 6 जणांच्या टोळीला मुरगोड पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून 9 हजार रुपये किंमतीच्या 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा आणि प्रिंटिंग मशिनरी व अन्य साहित्य जप्त केले आहे.
सुरेश सिद्धाप्पा मुरी (वय 27, रा. अरबट्टी, ता. गोकाक), लक्ष्मण मुरी (वय 24, रा. अरबट्टी, ता. गोकाक), मलाप्पा महादेव गोल्लण्णावर (वय 24, रा. अरबट्टी, ता. गोकाक), विजय उमेश बेडकिहाळ (वय 26, रा. बोरगाव, ता. चिकोडी), अक्षय दत्तात्रेय वड्डर (वय 24 रा. बोरगाव – चिकोडी) सुरज दत्तात्रय वड्डर (वय 21, रा. बोरगाव – चिकोडी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 17 फेब्रुवारी रोजी यरगट्टी येथील रेणुका बारमध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुरेश सिद्धार्थ मुरी हा दारू खरेदी करण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने काऊंटरवर दारुसाठी 500 रुपयाची नोट देऊ केली. मात्र काउंटरवरील व्यक्तीला संबंधित नोट संशयास्पद वाटल्याने त्यांने ती नोट घेण्यास नकार दिला. त्यावेळी सुरेश मुरी याने माझ्याकडे ही एकच नोट आहे त्या व्यतिरिक्त माझ्याकडे पैसे नाहीत, पाहिजे तर अंगावरचे कपडे काढतो आणि तुला पैसे देतो परंतु मला दारू दे अशी मागणी केली. त्यावेळी संबंधिताने ती 500ची नोट घेऊन सुरेश मुरी याला दारू दिली. मात्र त्यानंतर रात्री जमाखर्च पाहण्यासाठी रेणुका बारमध्ये आलेल्या कॅशियरला संबंधित बनावट नोटा आढळून येताच त्याने मुरगोड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताना येरगट्टी येथे सुरेश, लक्ष्मण, मल्लाप्पा, विजय, अक्षय व सुरज या आरोपींना गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 18 बनावट नोटा त्याचप्रमाणे बनावट नोटा छपाईसाठीचे आवश्यक साहित्य व प्रिंटिंग मशीन जप्त केले. याप्रकरणी मुरगोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.