Saturday, December 21, 2024

/

सैन्य दलात भरतीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रीय

 belgaum

सैन्य दल तसेच इतर बड्या नोकऱ्याचे आमिष दाखवून तरुणांची प्रचंड आर्थिक लूट करणारे एजंट पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देवून सावज हेरत बेळगावात त्यांची लुट सुरु झाली आहे. नोकरीच्या आशेने अनेकजण लाखो रुपये गमावू लागले असून अशा फसव्या एजंटांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. दरम्यान काही तरुणांनी अशा एजंटांविरोधात पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरु केल्या. तरीदेखील हे एजंट सुधारण्याचे नाव घेत नाहीत.

जाहिरातबाजी करुन मोठ्या नोकऱ्यांचे आमिष दाखविले जाते. यामुळे उमेदवार बेळगावला येतात. त्यांना काही काळापुरती थाटलेल्या कार्यालयांमध्ये बोलावून अनेक भूलथापा मारल्या जातात. १०० टक्के कामाची हमी देवून वेगवेगळ्या चाचण्यांच्या नावाखाली त्यांना मुंबई, पुणे, बेंगळूर, चेन्नई तसेच तिरुचन्नापल्ली सारख्या ठिकाणी दुसऱ्या एजंटांकडे पाठविले जाते.

२ ते ३ वर्षे पळापळीनंतर आपण फसलो गेलो आहोत हे संबंधित तरुणांच्या लक्षात येते. तोवर वेळ गेलेली असते, असे प्रकार मागील दोन ते तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सैन्यदल , बॉर्डर सेक्यूरेटी फोर्स , मर्चट नेवी. भारतीय नौदल भारतीय हवाईदल आदी ठिकाणी नोकऱ्यांची आमिषे दाखविली जावू लागली आहेत.

पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, असे सांगून लाख दोन लाख दिल्यास जीवनाचे कल्याण होईल. असे या तरुणांना भुलविले जात आहे. कोणत्याही नोकरीसाठी संबंधित सरकारी किंवा खासगी संस्था स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविते. याची कल्पना असूनही अशा फसव्या एजंटांच्या नादी अनेक जण लागू लागले असून फसवणुकीचा आकडा १ लाखावरुन ५ ते ६ लाखांवर जावून पोहचू लागला आहे. यामुळे या प्रकारातील गांभीर्य वाढु लागले आहे. कर्नाटक परिसरातील तरुणाला बेळगावच्या एका एजटाने असेच ठकविले होते. काम होत नसल्यास पैसे द्या, अशी मागणी त्या तरुणाने केली असता त्याला धनादेश देण्यात आले. हे धनादेश बँक खात्यावर जमा करता खात्यावर कोणतीच रक्कम नसल्याने ते वटलेले नसल्याची बाब निदर्शनाला आली होती. दरम्यान त्या तरुणाने एजंटाशी संपर्क साधला असता आपण आठवड्याभरात काम करुन देव अन्यथा पैसे वापस करु, असे सांगून त्याची बोळवण करण्यात आली आहे.

एकंदर कारभाराला तो तरुण कंटाळला असून आठवड्याभरात पैसे वापस न मिळाल्यास थेट पोलिसांत फिर्याद दाखल करणार असल्याची तयारी त्याने ठेवली होती. या एजंटाचे अनेक सबएजंट असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई व इतर शहरांमध्ये अशी एजंटगिरी करणाऱ्या मंडळींशी संधान साधून तरुणांना ठकविण्याचे एक मोठे रॅकेटच कार्यरत असल्याची माहिती उघड होवू लागली आहे. संबंधित एजंटांपासून ठकले जाण्यापूर्वीच तरुणांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या प्रकारच्या एजंटानी शहराच्या विविभ भागात थाटलेली कार्यालये त्यांच्या फसवणुकीची केंद्रे बनत चालली असून अशा केंद्रावर पोलीस दलाने बारीक नजर ठेवण्याची गरज आहे.

जी पदे सरकारी परीक्षा किंवा इतर प्रक्रियांशिवाय भरली जात नाहीत. त्यांच्या नावेही रक्कम उकळणे कायद्याने गुन्हा ठरत असून सरकारी यंत्रणांची बदनामी करणारे आहे. दरम्यान फसवणूक झालेल्या तरुणांनी पुढे येवून पोलिसांत तक्रार देण्याची गरज निर्माण झाली आहे. पाच वर्षांपूर्वी बॉर्डर सेक्युरेटी फोर्समध्ये नोकरी मिळवून देण्याचे सांगून एका एजंटाने चंदगड तालुक्यातील तब्बल ४२ तरुणांकडून प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये उकळले होते. त्या तरुणांनी पोलिसात फिर्याद केल्यानंतर ती रक्कम परत मिळाल्याचे उघडकीस आले आहे. यापुढे तरी याचा विचार होण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.