बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एखादी घटना घडल्यास ती पोलिस हद्दीच्या वादात अडकून पडत होती. पोलीस हद्दीचा प्रश्न आता निकालात काढण्यात आला असून पोलीस प्रशासनाकडून आता शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याची हद्द निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिस ठाण्याची हद्द सुरू आणि समाप्त असा उल्लेख असलेले फलक लावण्यात येत आहेत.
मार्केट पोलीस ठाण्यातर्फे गेल्या सोमवारी खडेबाजारसह विविध ठिकाणी हद्दीचे फलक उभारण्यात आले. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला असून उपनगरांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये असणाऱ्या जुन्या नकाशामध्ये बहुतांश नवीन उपनगरांची नोंद देखील नाही. परिणामी एखाद्या ठिकाणी खून, अपहरण, चोरी, अपघात किंवा अन्य घटना घडल्यास बऱ्याच वेळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारण्याची वेळ तक्रारदारांवर येत आहे.
दरम्यान, कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकरण घडले तरी पहिल्यांदा घटनेची नोंद करून घ्या, त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याकडे प्रकरण वर्ग करा, अशी सूचना पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी दिली आहे. त्यामुळे शहर पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यांच्या हद्दी ठरविण्यात आल्या आहेत. बहुतांश पोलिस ठाण्यांनी यापूर्वीच आपापल्या हद्दीवर फलक लावले आहेत. मार्केट पोलिसांनी मात्र दोन दिवसांपूर्वी खडेबाजारसह इतर ठिकाणी हद्दीचे फलक उभारले आहेत.