केक मध्ये टेडिबेअरची प्रतिकृती, पाणीपुरीचा केक किंवा महिला सक्षमीकरणाचा दाखला देणारा किक असे नानाविध प्रकारचे केक केकीजच्या सहकार्याने बेला (बेलगाम लेडीज) तर्फे आयोजित केक फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळाले. आज रविवारी सायंकाळी या केक फेस्टिव्हल अर्थात केक महोत्सवाची उस्फूर्त प्रतिसाद सांगता झाली.
बेळगावमधील ज्या महिला गृहउद्योग करून उद्योजकतेकडे वळून स्वावलंबी होत आहेत अशा महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने बेलाने टिळकवाडी येथील मिनी मिलेनियम गार्डन येथे या केक महोत्सवाचे खास आयोजन केले होते. गृह उद्योग करणाऱ्या महिलांना बाजारपेठेचे स्वरूप लक्षात यावे. त्यांच्या उत्पादित पदार्थांना बाजारपेठ मिळावी. संबंधित महिलांनी विक्री कौशल्य समजून घ्यावे या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
सदर महोत्सवात 22 हून अधिक महिलांनी आपले स्टॉल लावले होते. सर्वसामान्य केकच्या विविध प्रकारांसह रसमलाई केक, पाणीपुरी केक आदी वैविध्यपूर्ण स्वादाचे केकही याठिकाणी उपलब्ध होते. पाणीपुरीच्या स्वादाचा केक वैशाली पिराळे यांनी तयार केला होता, तर महिला सक्षमीकरणाचे उदाहरण देणारा केक नारीशक्ती या स्वयंसेवी संस्थेने मांडला होता. डमरू केक तेजश्री पाटील यांनी तर टायटॅनिक एक आरती शहा यांनी तयार केला होता.
या महोत्सवांमध्ये केकच्या गोड स्वादाबरोबरच चटपटीत अशी मिसळ, जोंधळ्याचे वडे, भेळ, स्वीट कॉर्न यांचे स्टॉलही होते. काल शनिवारी संध्याकाळी या महोत्सवाचे प्रायोजक कॅकीज् इंडियाच्या संचालिका स्वाती वायदंडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. रविवारी संध्याकाळी विविध प्रकारांच्या केकचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या खवय्यांच्या गर्दीने मिनी मिलेनियम गार्डन भरून गेले होते.