शहर परिसरातील चैनीला सोकावलेली मंडळी हलगाव मच्छी बायपास रस्त्याशेजारी शेतामध्ये घुसून त्याठिकाणी गांजा, अफीम आणि दारुच्या पार्ट्या करत असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे या नशेखोर मंडळींमुळे विशेष करून शेतकरी महिलांमध्ये घबराट पसरली आहे. तेंव्हा याची पोलीस खात्याने त्वरित दखल घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हालगा – मच्छे बायपास रस्त्याशेजारील शेतवाडी ही सध्या मद्यपी लोकांसह अफीम व गांजाची नशा करणाऱ्या नशेखोरांसाठी जणू आयते कुरणच बनले आहे. अलीकडच्या काळात बेळगाव परिसरातील मद्यपी आणि नशेखोरांचा सदर बायपास रस्त्याशेजारी शेतांमध्ये वावर वाढला आहे. सायंकाळनंतर ही नशेखोर मंडळी बेलाशकपणे रस्त्याशेजारी कोणच्याही शेतामध्ये घुसून पार्ट्या झोडपतात. रात्री उशिरापर्यंत रंगीत पार्ट्या करणारी संबंधित मंडळी फक्त पार्टी न करता नशेमध्ये शेत पिकांचेही नुकसान करतात. त्याचप्रमाणे पार्टी आटोपल्यानंतर दारूच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, अन्नपदार्थांचे खरकटे वगैरे सर्व कांही शेतामध्ये इतस्तता टाकून निघून जातात. नशिला चटावलेल्या या मंडळींमुळे पिकांचे नुकसान तर होतेच शिवाय त्यांनी शेतामध्ये जी अस्वच्छता निर्माण केलेली असते ती दूर करताना शेतकऱ्यांना बराच त्रास होतो. अलीकडच्या काळात हालगा – मच्छे बायपास रोडशेजारी शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांना सकाळी, सकाळी शेतातील कामे करण्याऐवजी दारूच्या बाटल्या काढणे, खरकाटे काढणे आदी स्वच्छतेचे काम करण्यासाठी जादा वेळ द्यावा लागत आहे.
मुळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याने हालगा-मच्छे बायपासचे बेकायदेशीर काम केले आहे. गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची भातपीकं गेली. आता उरलीसुरली रब्बी पीकं सांभाळण्यासाठी शेतकरी व महिलांना शेतात जाव लागत आहे. तथिपी शेतामध्ये कोणीही नसल्याची संधी साधून दिवसा व रात्री गांजा,अफिम,दारु ढोसत पार्ट्या करणारे येऊन पीकांची नासधूस करत आहेत. तसेच शेतातच काचेच्या बाटल्या फोडून जात असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतात नशा करण्यासाठी आलेला अर्धा जणांचा कंपू पाहून शेतकरी महिला भीतीने ताबडतोब आपले घर गाठत आहेत.
आपल्या गाड्या बायपासवर लावून नशेखोर,पार्टी करणारे बिनधास्त आपले कार्य उरकत असतात. गांजा,अफिम ओढणाऱ्यांचीतर या रस्त्यावर रोजच वर्दळ असते. तेंव्हा संबधित पोलीस ठाण्याने शेतकऱ्यांच्या पीकांचा तसेच शेतात जाण्यास घाबरणाऱ्या महिलांचा गांभीर्याने विचार करुन दिवसा व रात्री गांजा,अफिम व दारूच्या पार्ट्या करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच यासाठी येळ्ळूर, यरमाळ,धामणे रस्त्यावर वाळूच्या ट्रकची तपासनी करण्यासाठी जी पोलिस वाहन थांबवली जातात तीच वाहने राहून राहून हलगाव मच्छी बायपास रोडवरील शेतांवर नजर ठेवण्यासाठी फिरवल्यास शेतकरीवर्गाला दिलासा दिल्यासारखे होईल, अशी बेळगाव शहर रयत संघटना तसेच परिसरातील शेतकरीबंधूतर्फे मागणी आहे. यासंबधी लवकरच वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बैठक घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.