गॅस सिलिंडर स्फोटाच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केल्या केली असून यासाठी स्फोट न होणाऱ्या “ब्लास्ट प्रुफ” सिलिंडरची निर्मिती केली जात आहे. इलाईट कंपोझिट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनविण्यात आलेला हा सिलिंडर लवकरच ग्राहकांना पुरविण्यात येणार आहे.
स्वयंपाकासाठी सिलिंडर वापर करण्याची संख्या झपाट्याने वाढत असली तरी लोखंडी सिलिंडरचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. यासाठीच या “ब्लास्ट प्रुफ” सिलिंडरची निर्मिती करण्यात आली आहे. गो- गॅस कंपनीने इलाईट कंपोझिट तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या या नव्या सिलिंडरचे वजन लोखंडी सिलेंडरच्या तुलनेत अर्धे म्हणजे सुमारे 7 किलो आहे. यामध्ये गॅस किती आहे हे पाहणे देखील शक्य होणार असून हे सिलिंडर हाताळण्यास सोपे आहे.
दरम्यान, गॅस जोडणी सुलभ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता मागणी केल्यानंतर केवळ आठवड्याभरात गॅस जोडणी करणे शक्य होणार आहे. मात्र नागरिकांनी यासाठी ओळखपत्र व निवास पत्ता आदी माहितीसह 4,499 रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यानंतर स्फोटरहित सिलिंडर, तीन बर्नर, गॅस पाईप व रेग्युलेटर पुरविण्यात येणार आहे. गॅस जोडणीबाबतच्या नव्या निर्णयामुळे वेगवेगळ्या कारणास्तव स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना आता गॅस जोडणीसाठी कसरत करावी लागणार नाही. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी त्वरित गॅस जोडणी देण्यात येणार आहे.