बेळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांसाठी असलेली बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हा प्रकार ठेकेदारांच्या पथ्यावर पडला असल्याचे बोलले जात आहे.
बायोमेट्रिक हजेरी बंद झाल्यामुळे सध्या हजेरी बुकावरील नोंदीनुसार कामगारांचे वेतन व ठेकेदारांचे बिल मंजूर केले जात असल्याचे समजते. नेमके किती सफाई कामगार कामावर असतात ते कळावे व त्यानुसार त्यांचे वेतन करता यावे, त्याचप्रमाणे किती कंत्राटी कामगार रोज कामावर येतात अथवा गैरहजर राहतात हे आरोग्य विभागाला कळावे, सफाई ठेकेदाराकडून काही गैरव्यवहार होत असेल तर तो कळावा यासाठी बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात आली होती.
तथापि आता संगनमताने ही बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ठेकेदारांचे बिल आरोग्य विभागाकडून तयार होऊन लेखा विभागाकडे पाठवले जाते. आरोग्य विभागाकडून सफाई कामगारांच्या संख्येबाबत प्रश्न विचारला गेला नाही तर पुढे कुणीही त्याबाबत विचारणा करीत नाही. त्यामुळे ठेकेदाराने आरोग्य विभागाला हाताशी धरले की सर्वकाही सुरळीत होते. आता देखिल आरोग्य विभागाने बायोमेट्रिक हजेरीची सक्ती केली नसल्यामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावले असल्याचे बोलले जात आहे.
आमदार अभय पाटील यांनी अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीत सफाई कामगारांचा कामगारांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला होता. सफाईच्या कामासाठी आवश्यक कामगार उपस्थित नसतात हे आरोग्य निरीक्षकांनी त्यावेळी मान्य केले होते. त्यामुळे आरोग्य विभागाचे कामकाज चव्हाट्यावर आले होते. शहर स्वच्छतेच्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या महापालिकेतील पर्यावरण विभागाकडून बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करायला हवी, तथापि या विभागानेच ही सक्ती उठविल्याचे समजते.